Nita Ambani Pays Homage To Ancient City Kashi : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या दोघांचा विवाहसोहळा आज ( १२ जुलै २०२४ ) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या अंबानी कुटुंबीयांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. जामनगर व इटलीमधील दोन प्री-वेडिंग सोहळे, हळद-संगीत-मेहंदी असे लग्नाआधीचे भव्य विधी पार पडल्यावर आता हे जोडपं लग्नमंडपात सात फेरे घेऊन नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. या दोघांच्या लग्नाआधी नीता अंबानी यांनी खास व्हिडीओ शेअर करत अनंत-राधिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या शुभप्रसंगी देवाची प्रार्थना केली आहे.
नीता अंबानी यांचा हा खास व्हिडीओ ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. “जय काशी विश्वनाथ! काशी या शहराबरोबर आमचं एक भावनिक व विशेष नातं आहे. कोणत्याही शुभकार्याच्या आधी देवी-देवतांचा आशीर्वाद घेणं ही माझ्या कुटुंबीयांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते.” असं नीता अंबानी या व्हिडीओमध्ये सांगत आहेत.
नीता अंबानी पुढे म्हणतात, “माझी दोन्ही मुलं अनंत व राधिका यांच्यासाठी खास प्रार्थना म्हणून मी काही दिवसांपूर्वी वाराणसीला गेले होते. त्यांच्या लग्नाआधी आशीर्वाद घेण्यासाठी मी त्याठिकाणी जाऊन आले. काशीला आल्यावर तेथील मूळ भारतीय संस्कृतीची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे माझी मुलं लग्न करतील तेव्हा सर्वांना त्याठिकाणी काशीच्या पवित्र संस्कृतीची झलक दिसेल. काशीत महादेवांचा अधिवास आहे ही नगरी खरंच खूप पवित्र आहे. वाराणसीचा इतिहास, तिकडच्या परंपरा-संस्कृती, ऐतिहासिक वारसा या सगळ्याची झलक अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात पाहायला मिळेल.” अर्थात अनंत – राधिकासाठी खास काशीची प्रतिकृती जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा : Anant Ambani Wedding Live Updates: मुंबईत पावसाची संततधार, अंबानींच्या घराबाहेर परिस्थिती काय? पाहा Video
नीता अंबानींनी काशीची संस्कृती जपण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध काशी चाट भांडारच्या टीमला मुलाच्या लग्नासाठी मुंबईत आमंत्रित केलं आहे. पालक चाट, आलू टिक्की, कुल्फी फालुदा असे विविध पदार्थ लग्नसोहळ्यात जेवणाच्या मेन्यूमध्ये असतील. हा लग्नसोहळा १२ जुलै ते १५ जुलै असे तीन दिवस पार पडणार आहे.