आयुष्य माणसाला काय काय रंग दाखवील सांगता येत नाही. अशाश्वतता ही मानवी जीवनातली अपरिहार्यता आहे. पण गंमत अशी, की जोवर एखादा मोठा आघात होत नाही तोवर माणसं  आपलं वर्तमानात चाललंय तसंच सुरळीत आयुष्य सुरू राहणार असं गृहीतच धरून चाललेली असतात. आणि अचानक केव्हातरी अकल्पितपणे अशी एखादी भीषण घटना घडते, की सारं होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्या धक्क्य़ाने माणसं पार कोलमडून पडतात.. उद्ध्वस्त होतात. काही माणसं त्यातच संपतात. काही त्यातून यथावकाश सावरतात. पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची मांडामांड करतात. सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. अर्थात काळ हा सगळ्या आधीव्याधींवरचा रामबाण उपाय आहे.. आणि असतोच. तो आपलं काम करत राहतो. परंतु अशा एखाद्या भयाण संकटातदेखील त्यातून बाहेर पडण्याची माणसाची विजिगीषु वृत्ती उफाळून येते आणि मग अशी व्यक्ती त्या संकटावरही स्वार होत आपल्या मर्दुमकीचे झेंडे गाडते. अशांच्या कथा अजरामर होतात. पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याची आजपर्यंतची वाटचाल ही त्याच्या  या विजिगीषु वृत्तीचाच वानवळा आहे. असो.

प्रताप फड लिखित-दिग्दर्शित ‘अनन्या’ हे नवं नाटक अशाच एका सामान्य मुलीची असामान्य कहाणी आपल्यासमोर पेश करतं. सामान्यजनही अशा एखाद्या कसोटीच्या प्रसंगी आपल्या आंतरिक सामर्थ्यांच्या जोरावर अनेकदा असं काही कर्तब करून दाखवतात, की भल्याभल्यांनी तोंडात बोटं घालावीत. अनन्या देशमुख ही अशीच एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबातली. अभ्यासू, हुशार. आईच्या पश्चात वडिलांनी लाडाकोडात वाढवलेली. तिला एक भाऊही आहे.. धनंजय. प्रथम वर्गात पदवी प्राप्त केल्यानंतर सी. ए. व्हायचं तिचं स्वप्न आहे. पण दरम्यान, ‘शेखर सरपोतदार’ हे उद्योगपतीच्या मुलाचं स्थळ तिला सांगून येतं. अनन्याला खरं तर सी. ए. झाल्याखेरीज लग्न करायचं नसतं. परंतु इतकं चांगलं स्थळ तिचे वडील हातचं गमावू इच्छित नाहीत. शेखरही तिला तिच्या शिक्षणात लग्नामुळे कुठलीही आडकाठी येणार नाही याची ग्वाही देतो. प्रथमदर्शनीच तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. शेवटी अनन्या त्याच्या प्रस्तावास होकार देते. देशमुख कुटुंबाशी नातेसंबंध प्रस्थापित होत असतानाच शेखर धनंजयला (अनन्याच्या भावाला) त्यांच्या कंपनीत जॉब ऑफर करतो. साहजिकच घरात आनंदी आनंद पसरतो. आता सारं सुरळीत पार पडणार असं वाटत असतानाच अशी एक दुर्दैवी घटना घडते, की सगळंच उलटंपालटं होतं. ती घटना काय, हे इथं सांगणं अप्रस्तुत ठरेल. त्यासाठी प्रत्यक्ष नाटक बघणंच उचित.

Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Do You Know Which Animals can survive without oxygen
Animals That Live Without Oxygen: अविश्वसनीय! पण ‘हे’ प्राणी जगात ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; कोणते ते घ्या जाणून…
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

प्रताप फड या ताज्या दमाच्या लेखक-दिग्दर्शकानं अलीकडच्या काळात आपल्या एकांकिका आणि नाटकांनी जाणकार रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मानवी नातेसंबंध, त्यांतले तिढे, व्यक्ती-व्यक्तींमधील संबंधांत असणारे, परंतु न जाणवणारे सूक्ष्म ताणेबाणे आणि त्यांतलं नाटय़ त्यांना खुणावताना दिसतं. नाटकातील गिमिक्सच्या आहारी न जाता माणसाचं जगणं रेखाटण्यात त्यांना अधिक रस आहे. ‘अनन्या’ ही म्हटली तर एका सामान्य मुलीतील असामान्यत्वाची कहाणी आहे. पण ती तेवढीच नाहीए. तर अनन्याच्या अवतीभवती असलेल्या माणसांचं जगणंही या कहाणीला लगडलेलं आहे. ही माणसं खलप्रवृत्तीची आहेत का? तर.. नाही. परंतु प्राप्त परिस्थिती त्यांना तसं बनण्यास भाग पाडते. मूलत: माणूस हा तसा आपमतलबी ‘प्राणी’ आहे. अर्थात त्यापलीकडे तो ‘माणूस’ही आहेच. या दोन्हीचं मिश्रण त्याच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात वारंवार प्रत्ययाला येत असतं. ही खूणगाठ मनाशी बाळगूनच प्रताप फड यांनी या नाटकाची रचना  आणि हाताळणी केली आहे. वरवर पाहता अनन्याचं व्यक्तिमत्त्व, तिच्यावर अकल्पितपणे झालेला दुर्दैवी आघात, त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने केलेला अविरत, अविश्वसनीय संघर्ष आणि पादाक्रांत केलेलं यशाचं शिखर असा या नाटकाचा एकंदर प्रवास असला तरी मानवी नातेसंबंधांतील गुंत्यांचं अस्तरही त्याला आहे. त्यामुळेच ही कहाणी जशी अनन्याची आहे, तशीच अशा प्रकारच्या संकटात सापडलेल्या कुठल्याही कुटुंबाची ती प्रातिनिधिक कहाणी ठरू शकते. प्रताप फड यांनी ती अत्यंत प्रत्ययकारीतेनं चितारली आहे. ती साकारताना सिनेमॅटिक शैलीचा अवलंबही त्यांनी काही वेळा केला आहे; ज्यामुळे नाटकाची परिणामकारकता वाढली आहे. यातली सर्व पात्रं आपल्या अवतीभोवती दिसतील अशीच आहेत. अनन्याही याला अपवाद नाही. अनन्याची ही गोष्ट नवीन आहे अशातलाही भाग नाही. तरीही ती आपल्याला खिळवून ठेवते ती तिची रचना आणि मांडणीमुळे. ‘अनन्या’तली पात्रं हाडामांसाची, अस्सल आहेत. त्यांचे राग-लोभ, स्वार्थ-परमार्थ हेही जातीच्या माणसासारखेच आहेत. स्वाभाविकपणेच प्रेक्षक त्यांच्याशी स्वत:ला ताडून पाहू शकतात. या नाटकात वेगळं काय असेल, तर ती गोष्ट सांगण्याची पद्धती! नेहमीच्या घिशापिटय़ा पद्धतीला फाटा देत फड यांनी ती मंचित केली आहे. यातली पात्रं सामान्य ‘माणसा’सारखीच वागता-बोलतात, व्यक्त होतात. त्यांना नाटककर्त्यांनं दिलेली ‘ट्रीटमेंट’ मात्र वेगळी आहे. या नाटकात सकारात्मकतेचे ‘संवादी’ धडे न देता पात्रांच्या जगण्यातून ती संक्रमित करण्यात लेखक-दिग्दर्शक प्रताप फड हे यशस्वी झाले आहेत.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी अविनाश देशमुखांचं नाटकाची मागणी पुरवणारं आटोपशीर घर उभं केलं आहे. समीर सप्तीसकर यांनी पाश्र्वसंगीतातून घटना-प्रसंगांतील कमालीचं नाटय़ आणि नाटय़ांतर्गत मूडस् उठावदार केले आहेत. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनंही यात पूरक कामगिरी केली आहे. विजय भाईगडे (वेशभूषा) आणि शरद सावंत (रंगभूषा) यांचीही त्यांना चोख साथ लाभली आहे.

या नाटकात सर्वात कमाल केली आहे ती ऋतुजा बागवे या गुणी कलावतीने. गेली काही वर्षे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, नाटक ते मालिका असा प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीने आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केलेली आहेच; पण ‘अनन्या’ने तिला एक प्रचंड आव्हानात्मक भूमिका साकारायची संधी दिली; आणि तिनेही त्या संधीचं सोनं केलं आहे. हसत-खेळत आयुष्य जगणारी अनन्या अकल्पितपणे कोसळलेल्या संकटानं काही क्षण हतबुद्ध होते खरी; परंतु यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यालाच हात-पाय मारावे लागतील हे तिला कळून चुकतं. आणि आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीच्या- प्रियांकाच्या साहाय्याने ती या संकटावर स्वार होत विजिगीषु वृत्तीनं त्यावर मात करते. या सगळ्या प्रवासात नकळत तिला माणसंही कळत जातात. त्यामुळे खरं तर ती कडवट व्हायला हवी होती. परंतु अनन्याला त्यातलं वैय्यर्थ कळतं. आपल्या भोवतालच्या माणसांना ती आहेत तसंच स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा ती याच संकटातून कमावते. हा तिचा प्रवास तिच्यातलं ‘माणूसपण’ अधिक परिपक्व, प्रगल्भ करणारा आहे. या अर्थानं हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर जातं. ऋतुजा बागवेनं आपल्या व्यक्तिरेखेचे हे सारे कंगोरे इतक्या तपशिलांत समजून उमजून घेऊन साकारले आहेत, की हॅट्स ऑफ टू हर! ही भूमिका तिच्या कारकीर्दीतील एक अविस्मरणीय भूमिका ठरेल यात काहीच शंका नाही. अनन्याला ज्या परिस्थितीतून जावं लागतं, तिला तोंड देताना तिनं दाखवलेली सकारात्मकता, हार न मानण्याची वृत्ती आणि प्रतिकूलतेतूनही आपल्या आयुष्याला दिशा देण्याची तिची व्हिजन.. सगळंच अचंबित करणारं आहे. अनघा भगरे यांनी अनन्याची पडछायेसारखी पाठराखण करणाऱ्या प्रियांकाला यथोचित न्याय दिला आहे. प्रमोद पवार यांनी अनन्याच्या हतबल वडिलांची भूमिका त्यातल्या ताण्याबाण्यांसह उत्तमरीत्या वठवली आहे. विशाल मोरे यांनी अनन्याच्या भावाला- धनंजयला हाडामांसाचं व्यक्तित्व बहाल केलं आहे. शेखर सरपोतदारचं गोंधळलेपण आणि त्याची मानसिक कुतरओढ अजिंक्य ननावरे यांनी समूर्त केली आहे. जय दीक्षित हे एक रॉबिनहुड छापाचं पात्र यात आहे. त्याचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं सगळंच आगळंवेगळं. सिद्धार्थ बोडके यांनी जयचं हे भन्नाटपण आणि त्यातली खोली उत्कटतेनं अभिव्यक्त केली आहे. आपल्या जीवनजाणिवा समृद्ध करणारं ‘अनन्या’ नाटय़रसिकांनी एकदा तरी आवर्जून पाहायलाच हवं.

 

Story img Loader