दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या हे सर्वच कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. त्यांच्या या प्रमोशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यासोबतच अनन्या पांडेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘गहराइयां’ प्रमोशनसाठी फुल स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण वेगळंच आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या फोटोग्राफर्सना, ‘आज मी फुल स्लीव्ह घालून आले आहे.’ असं म्हणताना दिसत आहे. त्यावर एक फोटोग्राफर तिला विचारतो, ‘काल तुला थंडी लागत होती ना?’ फोटोग्राफरच्या या प्रश्नाला अनन्या होकार देते.
दरम्यान याआधी मुंबईत झालेल्या प्रमोशनच्या वेळी दीपिका, सिद्धांत आणि अनन्या यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली होती. पण त्यावेळी गार हवेमुळे अनन्या पांडेला थंडी लागत होती. ते पाहून सिद्धांतनं तिला स्वतःचं जॅकेट दिलं होतं. या प्रमोशनला अनन्यानं मरून रंगाचा ब्रालेट टॉप आणि त्यासोबत ऑफ व्हाइट फ्लोरल प्रिंटेड पॅन्ट घातली होती. पण या कपड्यांमुळे तिला थंडी लागत होती. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र अनन्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यानंतर अनन्यानं दिलेली ही प्रतिक्रिया फारच मजेशीर होती.
दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शननं केलं आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.