मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या आगामी चित्रपटांमुळे सातत्यानं चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘गहराइयां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अनन्यानं तिच्या लव्ह लाइफ आणि ब्रेकअपवर भाष्य केलं. तसेच तिनं तिच्या लव्ह लाइफबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘गहराइयां’ प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत अनन्यानं तिला प्रेमात धोका मिळाल्याची कबुली दिली. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलखाती अनन्या म्हणाली, ‘या चित्रपटात चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी माझ्यावर बराच दबाव होता. कारण मला माझ्या भूमिकेला न्याय द्यायचा होता. चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मला माझ्या दिग्दर्शकांकडून आणि सहकलकारांकडून बरंच काही शिकायचं होतं.’
अनन्या पांडेला या मुलाखतीत तिच्या लव्ह लाइफबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलताना तिनं काही धक्कादायक खुलासे केले. अगदी चित्रपटात दाखवण्यात आलं तसं नाही पण अनन्याला तिच्या खऱ्या आयुष्यातही प्रेमात धोका मिळाला आहे. अनन्या म्हणाली, ‘प्रेमात धोका मिळाल्यानंतर होणारं दुःख मी खऱ्या आयुष्यात देखील अनुभवलं आहे. पण हे अगदीच चित्रपटात दाखवण्यात आलंय तसं नाहीये.’
शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ चित्रपटात अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, धैर्य कारव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटात आधुनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.