अंमली पदार्थविरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर आज दुपारच्या सुमारास छापा टाकला आहे. मुंबईतील वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी दुपारी दोन वाजता मुंबई एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान या छाप्याचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यावरुनच आता स्वयंघोषित चित्रपट विश्लेषक असणाऱ्या कमाल आर खानने अनन्या पांडेला टोला लगावला आहे.
एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलावणं, तिच्या घरावर छापा टाकणं हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आल्यानंतर एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले आहे. याचबद्दल बोलताना कमाल आर खानने अनन्या पांडेने घरी काही पुरावे नसतील असं म्हटलं आहे. मात्र तिच्या घरी पुरावे आढळल्यास ती जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती ठरेल असंही कमाल आर खानने म्हटलं आहे.
“२० दिवसांनंतरही अनन्या पांडेने काही पुरावे शिल्लक ठेवले असतील तर ती जगातील सर्वात मोठी मूर्ख आहे,” असं ट्विट कमाल आर खानने केलं आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. याचाच संदर्भ देत कमाल आर खानने २० दिवसांचा उल्लेख ट्विटमध्ये केलाय.
एनसीबीने बुधवारी न्यायालयामध्ये आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.