अलीकडे बॉलीवूडमध्ये सीक्वेलपटांचा भरपूर बोलबाला आहे. तोच प्रकार जुन्या चित्रपटांतील गाण्यांच्या बाबतही होऊ लागला आहे. ‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’ या मनमोहन देसाईच्या गाजलेल्या चित्रपटांतील ‘तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय’ हे प्रचंड गाजलेलं गाणं काही शब्दबदल करून ‘वन्स अपॉन ए टाइम मुंबई दोबारा’मध्ये तसंच्या तसं वापरण्यात आलंय.
मोहम्मद रफींचा आवाज आणि त्याला कोरसची मस्त जोड देऊन ऋषी कपूर, मुकरी आणि नीतू सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचे स्वामित्व हक्क दिग्दर्शक मिलन लुथ्रियाने विकत घेतले. आता प्रश्न निर्माण झाला की मूळ गाण्यातील प्रसंग आजच्या या चित्रपटात कथानकात कसा बसवायचा आणि गाण्याचं चित्रीकरण कसं करायचं. ‘वन्स अपॉन..’च्या या सीक्वेलपटात इम्रान खान आणि सोनाक्षी सिन्हा आणि सोनाक्षीच्या वडिलांच्या भूमिकेतील टिकू तलसानिया यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘तय्यब अली.’ हे गाणं मूळ चित्रपटातील गाण्याच्या ‘टेकिंग’प्रमाणेच ‘शेम टू शेम’ चित्रित करण्याचा निर्णय दिग्दर्शकाने घेतला. या गाण्याबद्दल सांगताना इम्रान खान म्हणाला की, गाणं चित्रित कसं करायचं याच्यावर बराच विचार झाला. एवढंच नव्हे मूळ चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच आमच्या चित्रपटातही प्रसंग लिहिण्यात आला. परंतु, मूळ गाणं न वापरता दुसरं काय करता येईल यावर बराच खल झाला. नवीन गाणं, नवीन धून याचा बराच विचार करूनही काहीच चांगलं मिळत नव्हतं म्हणून अखेर मूळ गाणं घेण्यात आलं. अतिशय गाजलेलं गाणं ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं असताना मी ते कशा प्रकारे करावं याचा मी विचार केला. मला पटेल तसं गाणं चित्रितही झालं आणि युटय़ूबवर गाजलंही.
परंतु, एकदा डबिंग करून स्टुडिओतून बाहेर पडत असताना मला अचानक ऋषी कपूर भेटले. त्यांनी विचारलं ‘तय्यब अली’ तुझ्यावरच चित्रित झालेलं गाणं आहे ना. मी घाबरत-चाचरत हो म्हणालो, असं इम्रानने सांगितलं. मग मी त्यांना विचारलं तुमचं गाणं माझ्यावर चित्रित करायला नको होतं का यावर ते म्हणाले, अजिबात नाही, चांगलं केलंस तू गाणं. आत्मविश्वासाने केलंस असं जाणवलं, असं ऋषी कपूर म्हणाले आणि जीव भांडय़ात पडला. गाणं गाजूनही माझ्या मनातील धाकधूक संपली. आणि पहिल्यांदा मला जाणवलं की आपण गाणं केलं ते खरोखरच चांगलं केलं असावं, असं इम्रानने सांगितलं.