काही दिवसांपूर्वीच अभिनेता आयुष्यमान खुरानाचा ‘अंधाधून’ हा चित्रपट चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ नावाने प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोन आठवड्यातच चीनमध्ये तब्बल १५० कोटींची गल्ला जमवला होता. विषेश म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा तिप्पट होता. आता प्रदर्शनच्या तिसऱ्या आठवड्यात देखील ‘पिआनो प्लेअर’ची कमाई कायम आहे.
चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार ‘अंधाधून’ने आता पर्यंत चीनमध्ये तब्बल २०८.१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या पाच दिवसातच चीनमध्ये ९५.३८ कोटींची कमाई केली होती. परंतु ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती.
#AndhaDhun crosses $ 30 million / ₹ 200 cr in #China… Biz on [second] Sat and Sun is *higher* than [first] Sat and Sun… [Week 2] Fri $ 2.03 mn, Sat $ 4.45 mn, Sun $ 3.78 mn. Total: $ 30.06 mn [₹ 208.17 cr]… Power of solid content!
— taran adarsh (@taran_adarsh) April 15, 2019
आयुष्यमानचा ‘अंधाधून’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू सारखी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. भारतीय प्रेक्षकांची खूप चांगली पसंती या चित्रपटाला लाभली होती. त्यानंतर वर्षभराने हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय व्हायाकॉम १८ स्टुडिओने घेतला. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.
यापूर्वी चीनमध्ये आमिर खानच्या चित्रपटांची चलती पाहायला मिळाली होती. मात्र आता इतरही भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडिअम’ यांसारखे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले या चित्रपटांनी चांगली कमाई चीनमध्ये केली.