मराठीत विनोदी चित्रपटांची परंपरा मोठी आहे. त्या विनोदाच्या परंपरेत ‘आंधळी कोशिंबीर’ हा चित्रपट नक्कीच बसतो. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासह सर्वच प्रमुख कलावंतांचा धमाल अभिनय ही या चित्रपटाची भक्कम बाजू आणि विनोदपटाला आवश्यक असलेले पाश्र्वसंगीत आणि संगीत यांचा उत्तम मेळ साधला असला तरी अनावश्यक दृश्यांचे संकलन न केल्यामुळे तसेच गोष्ट फुलविण्यात कमी पडल्यामुळे हा चित्रपट पूर्णपणे नव्हे परंतु काही प्रमाणात प्रेक्षकांची करमणूक करण्यात यशस्वी ठरतो.
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच गोंधळ, गैरसमज यामुळे झालेली फजिती पाहायला मिळणार हे प्रेक्षकांना लगेच समजते. बापू सदावर्ते आणि शांती चिटणीस या अस्सल पुणेरी थाटाच्या व्यक्तिरेखा यात प्रमुख आहेत. प्रभात रोडवर झकास बंगल्यात राहणारे बापू आणि दुष्यंत मारणे नावाच्या वकिलाच्या घरात भाडय़ाने राहणाऱ्या शांती चिटणीस या पन्नाशी उलटलेल्या व्यक्ती अतिशय भांडखोर म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहेत. बापूंचा उडाणटप्पू मुलगा रंगा व त्याचा मित्र वश्या बापूंकडून पैसे मिळविण्यासाठी एक शक्कल लढवितात. बापूंना भांडणात हरविण्यासाठी शांती चिटणीस यांना पाचारण करतात. धादांत खोटे बोलून बापू-शांतीबाई यांना एकत्र आणल्यानंतर भलताच गोंधळ निर्माण होतो आणि चित्रपट वेगवेगळी धमाल वळणे घेतो.
पुणेरी व्यक्तिरेखा, त्यांचा तऱ्हेवाईकपणा, नको एवढा चिंगूस स्वभाव, सारखे ट्विटर-फेसबुकवर अपडेट करणारी वेडसर राधिका, अभिनेत्री बनण्याचे वेड जपणारी आणि त्यासाठी वरचेवर वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये अभिनयाची झलक दाखविण्याची हौस असलेली मंजी, मंजीचा गुंड भाऊ गोरक्ष, शांती चिटणीस यांच्यावर प्रेम करणारा वकील दुष्यंत मारणे अशा सगळ्या विनोदी व्यक्तिरेखांमधून वेगवेगळ्या तऱ्हा दाखविण्याचा चांगला प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. परंतु, सध्याच्या जमान्यात स्टॅण्डअप कॉमेडी प्रकार टीव्हीमुळे खूप लोकप्रिय झालाय हे बहुधा चित्रपटकर्ते विसरले असावेत. त्यामुळे पडद्यावर चाललेय ते कलावंतांच्या अभिनयामुळे सुसह्य़ ठरत असले तरी खळखळून हसण्यासाठी प्रेक्षकांना प्रयत्न करावे लागतात. वेडसर राधिका आणि गुंड गोरक्ष या व्यक्तिरेखांना अजिबात काहीच आलेख नाही. केवळ विनोदी पात्र असावे म्हणून राधिका हे पात्र घेतले असावे असे प्रेक्षकांना वाटत राहते. गैरसमजातून निर्माण झालेले गोंधळ आणि त्यातून विनोदनिर्मिती करताना चित्रपटकर्त्यांनी काही प्रसंग उगीचच घुसडल्यासारखे वाटतात. दुष्यंत मारणेचे शांती चिटणीसवरील प्रेम दाखविण्यासाठी सत्याग्रह आंदोलन काय किंवा नटसम्राट नाटकातील प्रसंग काय, त्याशिवाय न्यायालयातील प्रसंग यांना संकलन कात्री लावता आली असती तर चित्रपट आटोपशीर लांबीचा झाला असता. शीर्षक गीताबरोबरच वंदना गुप्ते-अशोक सराफ यांच्यावर चित्रीत झालेले गाणे आणि पाश्र्वसंगीतही मस्त आहे. अनिकेत विश्वासराव-हेमंत ढोमे या जोडीने साकारलेले रंगा-वश्या, मृण्मयी देशपांडेने साकारलेली राधिका या व्यक्तिरेखा उत्तम साकारल्या आहेत. आनंद इंगळे यांनीही प्रेमात वेडा झालेला कवी आणि वकील दुष्यंत मारणे साकारून धमाल केली आहे. परंतु, स्टॅण्डअप कॉमेडी प्रकार दररोज टीव्हीवरून पाहत असल्यामुळे प्रेक्षकांना विनोदपट खूप खळखळून हसविण्यात कमी पडतो. अशोक सराफ-वंदना गुप्ते जोडीचा धमाल अभिनय हे चित्रपटाचे सामथ्र्य असून सर्व प्रमुख कलावंतांनी चांगला अभिनय केला आहे.
चित्रपटाच्या शीर्षकांमधूनच धमाल विनोदी प्रसंग पाहायला मिळणार याची झलक मिळते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकेका व्यक्तिरेखेची ओळख करून देताना त्या व्यक्तिरेखांचा इरसालपणा दिग्दर्शकाने अधोरेखित केला आहे. त्यामुळे आता चित्रपटात खूप धमाल पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटत राहते. विनोदपटामध्ये अनेकदा तर्कसुसंगतपणा नसला तरी चित्रपट प्रेक्षकांची हसवणूक करण्यात यशस्वी ठरू शकतो अशी उदाहरणे आहेत. परंतु, या चित्रपटात ती गंमत कुठेतरी कमी पडली असे जाणवत राहते. मर्यादित स्वरूपात हसवणूक करणारा हा चित्रपट असला तरी स्टॅण्डअप कॉमेडी भरपूर पाहिल्यानंतर प्रेक्षकाला हसविण्यासाठीची नामी क्लृप्ती चित्रपटकर्ते करू शकलेले नाहीत. पुणेरी पाटय़ांमुळे पुणेरी माणसे अवलिया असतात, नमुनेदार स्वभावाच्या असतात हे प्रेक्षकांना माहीत झाले आहे. म्हणूनच नमुनेदार, अस्सल तऱ्हेवाईक व्यक्तिरेखा आणि त्यांचे अस्सल विनोदी प्रसंग यांची लेखनातून सरमिसळ करण्यात चित्रपटकर्ते कमी पडले आहेत हे प्रेक्षकांना कळते. त्यामुळेच निखळ करमणूक करणारा हा आंधळी कोशिंबीरीचा खेळ फक्त कलावंतांच्या अभिनय सामर्थ्यांच्या जोरावर पाहणीय ठरतो. दुष्यंत मारणे हा प्रौढ प्रेमवीर केवळ वकील असल्यामुळे न्यायालयाचा प्रसंग दिग्दर्शकाने घेतला आहे असे दाखविले आहे ते खटकते. अनिकेत विश्वासराव-हेमंत ढोमे या जोडीनेही बऱ्यापैकी विनोदी अभिनय केला आहे. अशोक सराफ-वंदना गुप्ते जोडीच्या धमाल अभिनयामुळे प्रेक्षकाला चित्रपट गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
आंधळी कोशिंबीर
निर्माती – अनुया म्हैसकर
सहनिर्माता – सचिन अवस्थी
कार्यकारी निर्माता – नितीन प्रकाश वैद्य
दिग्दर्शक – आदित्य इंगळे
पटकथा-संवाद – आदित्य इंगळे, प्रताप देशमुख
गीते – वैभव जोशी
संगीत – नरेंद्र भिडे
शीर्षक संगीत व पाश्र्वसंगीत – अविनाश-विश्वजीत
संकलन – प्रवीण प्रभाकर जहागीरदार
कलावंत – अनिकेत विश्वासराव, अशोक सराफ, वंदना गुप्ते, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी, अक्षय टांकसाळे व अन्य
धमाल अभिनयाची मेजवानी
मराठीत विनोदी चित्रपटांची परंपरा मोठी आहे. त्या विनोदाच्या परंपरेत ‘आंधळी कोशिंबीर’ हा चित्रपट नक्कीच बसतो. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासह सर्वच प्रमुख कलावंतांचा धमाल अभिनय ही या चित्रपटाची भक्कम बाजू
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 01-06-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhali koshimbir movie review marathi movie film review