मराठी चित्रपटांमध्ये विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न दिसत नाहीत. त्याचबरोबर हिंदू-मुस्लीम संघर्ष, दंगल अशा संवेदनशील विषयांवर फारसे चित्रपट आलेले दिसत नाहीत. ‘अंगारकी’ हा चित्रपट अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घडलेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीची गोष्ट सांगणारा असला आणि मराठीत या विषयावरील नवा चित्रपट असला तरी ही दंगल म्हणजे एक लुटुपुटीचा प्रसंग वाटतो आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा एक प्रसंग एवढय़ापुरताच मर्यादित राहिल्यामुळे अतिशय फुसका बार ठरतो.
हिंदू-मुस्लीम यांच्यात ऐक्य झाले पाहिजे, तेढ संपली पाहिजे हे वेगवेगळ्या प्रकारे हिंदी चित्रपटांतून अनेकदा दाखवून झाले आहे. कधी प्रेमकहाणीच्या माध्यमातून तर कधी ‘शेजारी’ या चित्रपटातूनही व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्गजांनी हा समपर्कपणे मांडला आहे. धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी लेखक-दिग्दर्शकांनी केलेला तकलादू प्रयत्न एवढेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल.
बिंदुमाधव गंगातीर्थकर असे विचित्र नाव असलेला अविवाहित मराठीचा प्राध्यापक नोकरीच्या निमित्ताने एका छोटय़ा शहरात राहायला येतो. भाडय़ाच्या एका छोटय़ाशा घरात राहतो. त्याच्या शेजारी शबनम ही मुस्लीम तरुणी राहात असते. तिच्या सौंदर्याविषयी बिंदुमाधवचे सहप्राध्यापक व मित्र अनेकदा चेष्टामस्करी करतात. शबनम आणि तिचे आजोबा म्हणजे अब्बू यांचे किरकोळ वस्तू विक्रीचे दुकान आहे. त्यानिमित्ताने या छोटय़ा शहरातील एका मोहल्ल्यातील समस्त तरुण दिवसभरात केव्हातरी शबनमला पाहण्याच्या निमित्ताने दुकानात वस्तू खरेदीसाठी जातात. एकदा बाजारात खरेदीला म्हणून शबनम जाते आणि दंगल उसळते. याच वेळी बिंदुमाधवही बाजारहाट करायला गेलेला असतो. दंगल उसळल्यावर बिंदुमाधव जीव मुठीत घेऊन पळतो आणि घरी येतो. मागोमाग शबनमही त्याच्या घरात येते. मग संचारबंदी लागू होते आणि शबनम व बिंदुमाधव यांना एक रात्र सोबत काढावी लागते.
मुळात लेखकाने बिंदुमाधव गंगातीर्थकर असे अतिरंजित नाव प्रमुख व्यक्तिरेखेला देऊन भाष्य करण्याचा केलेला प्रयत्न हाच हास्यास्पद म्हणावा लागेल. अंगारकी असल्यामुळे नायक बिंदुमाधवचा उपवास आहे आणि शबनम त्याच्या घरात जीव वाचविण्यासाठी शिरते तेव्हा ती मटण घेऊन आलेली असते. हे समजल्यावर सनातनी वृत्तीच्या बिंदुमाधव तिचा तिरस्कार करतो. तुम्ही लोक सुधारणार नाही वगैरे बोलतो. हा त्याचा दृष्टिकोन ब्राह्मणी हिंदू असल्याचे दाखविण्यासाठी लेखक-दिग्दर्शकांनी केला आहे. आपल्या तथाकथित धर्मनिरपेक्ष मुद्दय़ाच्या पुष्टय़र्थ शबनम हिंदूच्या घरात जीव वाचविण्यासाठी येते, तसेच बिंदुमाधवचा मित्र आणि हिंदू शबनमच्या घरात जीव वाचविण्यासाठी आसरा घेतो आणि तिथे मात्र त्याला चांगली वागणूक मिळते असे दाखविले आहे.
घटनाक्रम हा आणि एवढाच असल्यामुळे दंगल, हिंदू-मुस्लीम यांच्या चालीरिती, गैरसमज यावर भाष्य करण्याचा किंचितसा प्रयत्न चित्रपट करतो, परंतु दिग्दर्शकाने या फारसा जीव नसलेल्या कथेची मांडणी करताना कोणतीच कल्पकता दाखविलेली नाही. त्यामुळे दंगल ही लुटुपुटुची वाटते आणि शबनम-बिंदुमाधव यांच्यावरील प्रसंग अजिबात परिणामकारक ठरत नाही. परिणामी चित्रपट सपशेल फसतो. प्रमुख भूमिकेतील मकरंद अनासपुरे, तेजस्विनी पंडित आणि अवतार गिल कल्पनाशून्य व कथानकात अजिबात सविस्तरपणे न चितारलेल्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत एवढेच म्हणता येईल. धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा रेटण्यासाठी केलेला लेखक-दिग्दर्शकांचा हा प्रयत्न सपशेल फुसका बारच म्हणावा लागेल.
अंगारकी
आयडियल एण्टरटेन्मेंट्स
निर्माता – अविनाशजी मोहिते
दिग्दर्शक – चंद्रकांत दुधगांवकर
कथा-पटकथा-संवाद – संजय पवार
संगीत – हर्षित अभिराज
कलावंत – मकरंद अनासपुरे, तेजस्विनी पंडित, अवतार गिल, स्वप्नील राजशेखर, शरद पोंक्षे, विलास रकटे, डॉ. विलास उजवणे, गार्गी पटेल, महेश भोसले, संदीप गायकवाड, नयन जाधव, व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा