Angelina Jolie Brad Pitt Divorce : अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी घटस्फोटाच्या प्रक्रियेत अखेर तोडगा काढला असल्याचे अँजेलिना जोलीच्या वकिलांनी सोमवारी (३० सप्टेंबर २०२४) ला सांगितले. हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकालीन आणि वादग्रस्त घटस्फोटांपैकी एक अशा प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.
अँजेलिना जोलीचे वकील जेम्स सायमन यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, या जोडीने घटस्फोटावर सहमती दर्शवली आहे. अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट घटस्फोटाच्या प्रक्रियेत अखेर तोडगा निघाला ही बातमी प्रथम पीपल मॅगझिनने दिली होती. अँजेलिना जोलीचे वकील जेम्स सायमन यांनी निवेदनात म्हटले, “आठ वर्षांपूर्वी अँजेलिनाने ब्रॅड पिटपासून वेगळे होत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता ती आणि तिच्या मुलांनी पिटबरोबर शेअर केलेल्या सर्व संपत्ती सोडली असून तिने कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. या घटस्फोटाला खूप मोठा कालावधी लागला. खरं सांगायचं तर, अँजेलिना खूप थकली आहे, पण हे प्रकरण आता संपत आल्याने तिने सुटकेचा निश्वास सोडला आहे.”
हेही वाचा…“मी वैतागलो आहे”, अनुराग कश्यपने घेतला मुंबई सोडण्याचा निर्णय; म्हणाला, “मला जिथे काम…”
सध्या या प्रकरणात कोणतेही न्यायालयीन दस्तऐवज सादर करण्यात आलेले नाहीत, आणि न्यायाधीशाने या करारावर स्वाक्षरी करणे बाकी आहे. अशी माहिती त्यांनी दिली. ब्रॅड पिटच्या वकिलांना सोमवारी रात्री उशिरा पाठवलेल्या ईमेलला अद्याप उत्तर मिळालेले नाही. अँजेलिना जोली (४९) आणि ब्रॅड पिट (६१) हे १२ वर्षे हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होते. दोन्ही ऑस्कर विजेत्यांना सहा मुले आहेत. अँजेलिना जोलीने २०१६ मध्ये घटस्फोटाचा अर्ज केला होता. त्याआधी युरोपमधून परतणाऱ्या खाजगी जेट फ्लाइटदरम्यान ब्रॅड पिटने अँजेलिना आणि तिच्या मुलांना कथितपणे वाईट वागणूक दिल्याचा आरोप तिने केला होता.
२०१९ मध्ये एका न्यायाधीशाने त्यांना कायदेशीरदृष्ट्या घटस्फोटित आणि अविवाहित घोषित केले, मात्र संपत्तीचे विभाजन आणि मुलांच्या कस्टडीचा तिढा वेगळा होता. दोघांनी नियुक्त केलेल्या एका खाजगी न्यायाधीशाने मुलांच्या समान कस्टडीसह एक निर्णय दिला, परंतु अँजेलिना जोलीने या न्यायाधीशाविरुद्ध हितसंबंधांशी संबंधित आरोप करत त्याला हटवण्याची मागणी केली. अपील न्यायालयानेही अँजेलिना जोलीच्या बाजूने निर्णय दिला, न्यायाधीश हटवण्यात आला.
या दोघांच्या घटस्फोटासाठी दोघांमध्ये कोणते करार झाले त्याचा अधिक तपशील अजून उघड करण्यात आलेला नाही. अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्न करण्याआधी त्यांनी १० वर्षे एकमेकांना डेट केले होते.
© IE Online Media Services (P) Ltd