यादवीत होरपळलेल्या अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या कर्करोग निवारण कार्यात झोकून दिलेली आणि स्वत: बीजकोशाच्या कर्करोगाने २००७ मध्ये निधन पावलेली आपली आई मार्शेलिन बट्र्राड हिची भूमिका हॉलीवूड तारका अँजेलिना जोली पडद्यावर साकारणार आहे.
स्तनांच्या कर्करोगाच्या भीतीने ३७ वर्षीय अँजेलिनाने १६ फेब्रुवारीला आपल्यावर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे कर्करोग या विषयावर हळव्या झालेल्या अँजेलिनाने आपल्या आईचेच जीवन रूपेरी पडद्यावर आणण्याचे ठरविले आहे. अँजेलिनाचा जोडीदार ब्रॅड पिट् याच्या ‘प्लॅन बी’ या कंपनीतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
अँजेलिनाची आई मार्शेलिन बट्र्राड यांनी मानवतावादी कार्यात स्वतला झोकून दिले होते. अफगाणिस्तानातील कर्करोगग्रस्त महिलांसाठी त्यांनी मोठे काम केले होते. त्यासाठी त्यांनी ‘गिव्ह लव्ह गिव्ह लाइफ’ ही संस्थाही स्थापन केली होती.
माझ्या दोन्ही भावांसह मीसुद्धा आयुष्यात स्थिरस्थावर झालेले तिला पाहाता आले याचा मला आनंद वाटतो. आम्ही आमच्या आयुष्यात स्थिर झाल्याचे पाहिल्यावरच तिने डोळे मिटले, असे भावुक उद्गार अँजेलिनाने काढले.