तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबान्यांपासून आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अफगाणी नागरिक प्रयत्न करत आहेत. अफगाणी इतर देशांकडून मदत मागत आहेत. अशातच अफगाणिस्तान मधील एका मुलीने हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अँजलिना जोलीला मदतीचा हात मागितला आहे. अँजलिनाला त्या मुलीने पत्र लिहिले होते. हे पत्र अँजलिनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अँजलिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पत्र शेअर केल आहे. हे पत्र सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अँजलिनाने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. हे पत्र अफगाणिस्तानमधील एका लहाण मुलीने लिहिलं आहे. ही पोस्ट शेअर करत अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्याचे आश्वासन तिने दिले आहे. या पोस्टमधून मुलींची आणि स्त्रियांची परिस्थितीती किती बिकट आणि भीतीदायक आहे ते दिसत आहे. या पोस्टमध्ये अँलजिनाने त्या मुलीचे पत्र आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचा एक फोटो शेअर केला आहे. हे पत्र शेअर करत ‘मला हे पत्र अफगाणिस्तान मधील एका मुलीने पाठवले आहे. सध्या अफगाणिस्तानच्या लोकांकडे सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी किंवा त्यांची प्रतिक्रिया मुक्तपणे देण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांची कहाणी आणि जगभरातून त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांचे आवाज शेअर करण्यासाठी मी इन्स्टाग्रामवर आली आहे,’ असे अँजलिना म्हणाली.
View this post on Instagram
पुढे अँजलिना म्हणाली, ‘ही गोष्ट २० वर्षांपूर्वीची आहे. ९/११ घटनेच्या दोन आठवड्यांआधी मी अफगाणिस्तानच्या सीमेवर होते, तिथे माझी भेट तालिबानमधून पळून आलेल्या अफगाणिस्तानच्या लोकांशी झाली. अफगाणिस्तानच्या लोकांना पुन्हा एकदा अशा परिस्थितीत पाहणे धक्कादायक आहे. इतका वेळ आणि पैसा खर्च करणे, रक्त गाळत मेहनत करणे आणि मग हे असं सगळ गमवणे, या गोष्टीला समजून घेण जवळजवळ अशक्य आहे.’
आणखी वाचा : रिया कपूरच्या लग्नाच्या ६ दिवसानंतर आई सुनीता कपूरने शेअर केला फोटो, म्हणाल्या…
पुढे अँजलिना म्हणाली, ‘कित्येक दशकांपासून अफगाणच्या लोकांना पाहत आहे. ते लोक जगातील सर्वात सक्षम लोकांपैकी एक आहेत. त्यांना मिळणारी वागणूक पाहून वाईट वाटतंय. जर त्यांच्याकडे सगळी साधणे आणि सुविधा असत्या तर त्यांना स्वत: साठी किती गोष्ट करता आल्या असत्या. मी अशा अनेक मुलींना भेटली ज्यांना फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणासाठी त्यांनी लढा ही दिला होता. वचनबद्ध असलेल्या इतरांप्रमाणे, मी मागे हटणार नाही. मी मदतीसाठी मार्ग शोधत राहीन आणि मला आशा आहे की तुम्ही सगळे माझी साथ द्याल.’
दरम्यान, अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडताच तालिबानने तिथे कब्जा करण्यास सुरुवात केली. १५ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्रपती महल ताब्यात घेतला. अफगाणिस्तानवर तालिबानच्या पूर्वीच्या राजवट ही १९९६ ते २००१ या काळात होती. या काळात तालिबान्यांनी मुली आणि महिलांवर अत्याचार केला.