ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे.
‘संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक; ज्याची जरब खुद्द औरंगाजेबलाही बसली.’ ‘तू असामान्य आहेस, आजपासून काशिनाथ घाणेकर पर्व सुरु तर होतेय…’ ‘या थिएटरचा लांडगा एकच आहे आणि तो मी आहे मी…’ , ‘ जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही तोपर्यंत लाल्या होत नाही’ यासारखे डायलॉग ट्रेलरमध्ये आहेत. या दमदार ट्रेलरच्या आधी दोन टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. पहिल्या टीझरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची ओळख करण्यात आली होती. तर या दुसऱ्या टीझरमध्ये काशिनाथ घाणेकर यांच्यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं अतुलनीय योगदान आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस कसे आणले हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.
‘…आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये अमृता खानिवालकरची महत्वाची भूमिका असणार आहे. अमृता कोणती भूमिका साकरतेय हे अद्याप स्पष्ट झाली नाही. पण प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, अमृता या चित्रपटामध्ये संध्याच्या भूमिकेत झळकणार आहे.
ओळखा पाहु ….कोण आहे मी ? #AniDrKashinathGhanekar https://t.co/CyzsuFKqfx @subodhbhave @Viacom18Marathi @unbollywood @phulawa21 pic.twitter.com/R6bXQUU7kx
— Amruta Khanvilkar (@AmrutaOfficial) October 19, 2018
डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. त्यांची झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेता सुबोध भावे हा काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत दिसणार असून सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मोहन जोशी असे स्टार कलाकार या चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ८ नोव्हेंबर राजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. आपल्या कसदार अभिनयानं घाणेकरांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यांच्या केवळ प्रवेशानं नाट्यगृह शिट्ट्या, टाळ्यांनी दणाणून जायचे. त्यांना भेटण्यासाठी नाट्य रसिकांमध्ये अक्षरश: झुंबड उडायची. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’,’इथे ओशाळला मृत्यू’,’अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. घाणेकरांचे आजही लाखो चाहते आहेत. त्यामुळं या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.