अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. ‘वेलकम बॅक’सारख्या चित्रपटात नानाबरोबर पुन्हा एकदा जमवलेली अभिनयाची भट्टी असेल नाहीतर त्यांचा ‘२४’ हा बहुचर्चित शो असेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही ‘जबरदस्त’ असते. अनिल कपूर यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनिल कपूर यांनी श्रीदेवींसोबत बरेच सुपरहिट चित्रपट केले. पण श्रीदेवींच्या ‘चालबाज’ या चित्रपटातील भूमिकेला त्यांनी स्वत:हून नकार दिला होता हे फार क्वचित लोकांना माहित असेल.
खान युगातल्या प्रत्येक नटाला टक्कर देऊन ८० ते ९० च्या दशकात सक्षमपणे आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. ‘चालबाज’ हा चित्रपट हेमा मालिनी यांच्या सीता और गीता चित्रपटाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवी यांनी. या चित्रपटातील भूमिकेची ऑफर अभिनेते अनिल कपूर यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. हा किस्सा स्वत: अनिल कपूर यांनी एका रिअॅलिटी शोच्या मंचावर सांगितला.
‘अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन कसं करायचं हे श्रीदेवी यांना ठाऊक होतं. जबरदस्त व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्या जेव्हा स्क्रीनवर झळकत, तेव्हा इतर कोणाकडेच लक्ष जात नाही. त्यांच्यासोबत चालबाज या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती. या चित्रपटात त्या दुहेरी भूमिका साकारत होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर मला काय मिळणार असा मी विचार आणि तो चित्रपट नाकारला. चालबाजमधील त्यांनी साकारलेल्या भूमिकांची तुलनाच होऊ शकत नाही,’ असं अनिल कपूर म्हणाले होते.
‘चालबाज’मध्ये श्रीदेवी यांच्यासोबत सनी देओल आणि रजनीकांत यांनी भूमिका साकारली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात एकत्र काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला.