बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘लम्हे’ हा आहे. ‘लम्हे’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटात श्रीदेवी यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.
आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने अनिल कपूर यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या चित्रपटातील काही फोटो शेअर करत “यश चोप्रा यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट लम्हेला प्रदर्शित होऊन ३० वर्षे झाल्याचा आनंद साजर करत आहे…एक विश्वासाची झेप मी घेतली आणि या लोकप्रिय चित्रपटाचा एक भाग झालो याचा आनंद आहे”, अशा आशयाती पोस्ट अनिल यांनी केली आहे. अनिल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
‘लम्हे’ हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वीरेनला पल्लवीवर प्रेम होते. मात्र, ती सिद्धार्थशी लग्न करते. या जोडप्याचे निधन होते. तर, त्यांची मुलगी मोठी झाल्यावर पल्लवीसारखीच हुबेहुब दिसत असते आणि यावेळी तिला वीरेनवर प्रेम होते.