शिक्षण व्यवस्थेतील दोष आणि विद्यार्थ्यांवरील पालकांचे दडपण या विषयांवर परखडपणे भाष्य करणारा मराठीतील ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. दिग्दर्शक महेश मांजरेकर आता हा चित्रपट हिंदीत बनवणार असून, चित्रपटासाठी ते सध्या मुख्य कलाकाराच्या शोधात आहे. त्यासाठी बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर आणि महेश मांजरेकर यांच्यात सध्या बोलणी सुरू असल्याचे समजते. यापूर्वी महेश मांजरेकरने मुख्य भूमिकेसाठी गोविंदालादेखील विचारून पाहिले होते. मात्र, या चित्रपटातील वडिलांची भूमिका काहीशी नकारात्मक असल्याने गोविंदाने ही भूमिका नाकारली. त्यामुळे मांजरेकर यांनी मुख्य भूमिकेसाठी अनिल कपूरला गळ घातली आहे. शिक्षणव्यवस्थेतील दोष आणि पालकांच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांच्या जीवनात निर्माण होणारा ताण या सगळ्याचे प्रभावी चित्रण ‘शिक्षणाच्या आयचा घो’मध्ये करण्यात आले होते. मराठीत हा चित्रपट चांगलाच यशस्वीसुद्धा ठरला होता. त्यामुळे आता हिंदीतील या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. दरम्यान, अनिल कपूरने मुख्य भूमिकेचा प्रस्ताव नाकारल्यास महेश मांजरेकर ‘शिक्षणाच्या आयचा घो’च्या मुख्य भूमिकेसाठी अभिनेता अर्जून रामपालला विचारणा करू शकतो, असे समजत आहे. महेश मांजरेकर यांना याविषयी विचारले असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.
‘शिक्षणाच्या आयचा घो’ आता हिंदीत, मुख्य भूमिकेत अनिल कपूर?
शिक्षण व्यवस्थेतील दोष आणि विद्यार्थ्यांवरील पालकांचे दडपण या विषयांवर परखडपणे भाष्य करणारा मराठीतील 'शिक्षणाच्या आयचा घो' हा चित्रपट अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता.
First published on: 15-07-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor to play the lead in shikshanachya aicha gho remake