रेश्मा राईकवार
‘अॅनिमल’ या नावाने रुपेरी पडद्यावर आलेला संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित रक्तरंजित गोंधळ हा फक्त रणबीर कपूरच्या जबरदस्त अभिनयापलीकडे भयंकर रटाळ अनुभव आहे. मुळात साडेतीन तासांच्या या लांबलचक चित्रपटात नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे हा उद्देश स्पष्ट होत नाही म्हणण्यापेक्षा लेखक – दिग्दर्शकाची मर्यादा, त्यांच्याच विचारातील गोंधळ आणि हिंसक, अंहकारी पुरुषाची प्रतिमा मोठी करत उगाचच काहीतरी भव्य पटलावर ठेवतो आहोत असं दाखवण्याचा अट्टहास ठायी ठायी दाखवून देतो. रणबीर कपूर, अनिल कपूर आणि नव्याने प्रकाशझोतात आलेला बॉबी देओल असे ताकदीचे कलाकार या भयंकर, अनाठायी कथेत वाया गेले आहेत. हा चित्रपट ना धड न्वार शैलीत आहे, ना निओ न्वार, ना मानसिक गुंतागुंत रंगवणारा रहस्यपट, थरारपट.. केवळ दाक्षिणात्य व्यावसायिक मसालापटांची जी एक प्रचलित शैली आहे त्याचाच वापर करून ‘अॅनिमल पार्क’ नावाचा जो गोंधळ घातला जाणार आहे त्याची कल्पना न केलेली बरी..
‘अॅनिमल’चा ट्रेलर झळकल्यापासून या चित्रपटातील रणबीरचा न पाहिलेला अवतार, त्याच्या परिचित भूमिकांपेक्षा वेगळं काही पाहण्याची संधी असेल अशी अपेक्षा मनात तयार होते. संदीप रेड्डी वांगाचा ‘अर्जुन’ आणि त्याचाच हिंदी रिमेक असलेला ‘कबीर सिंग’ पाहिलेल्यांना त्याच्या एकूणच आक्रस्ताळी, काहीशी अतिरेकी वाटणाऱ्या मांडणीची शैली किमान परिचयाची आहे. इथे वडिलांच्या प्रेमाने झपाटलेला आणि त्यांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या तरुणाची काहीएक मानसिक गुंतागुंत, त्यांच्या नात्यातील ताणेबाणे असतील असा अंदाज ट्रेलरवरून येतो. अशा प्रकारे काहीएक मानसिक आजार असलेली वा प्रचंड विक्षिप्त स्वभाव असलेली व्यक्तिरेखा याआधीही पडद्यावर आलेल्या आहेत. रणबीरच्याच बाबतीत बोलायचं झालं तर हा चित्रपट पाहतानाही ‘संजू’ चित्रपटातील त्याची भूमिका आठवते. हेकेखोर स्वभाव, वडिलांवर असलेलं प्रेम आणि त्यांच्याबद्दलचा राग यातून तयार झालेली विचित्र मानसिकता त्यातही होती. अनेकदा या चित्रपटातही रणबीरला पाहताना ‘संजू’तील त्याचे लूकच उचलून इथे दाखवत असल्याचा भास होतो.
बलबीर सिंग नामक यशस्वी उद्योजक आणि त्यांचा मुलगा रणविजय यांच्याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. आपला उद्योग उभारण्यात मग्न असलेल्या बलबीर यांना आपल्या मुलांना हवा तसा वेळ देता येत नाही. रणविजयचं वडिलांवर वेडय़ासारखं प्रेम आहे. त्यांच्यासारखी आदर्श व्यक्ती कोणी असूच शकत नाही. ‘बलबीर द सेकंड’ होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या विजयला वडिलांचं प्रेम आणि वेळ दोन्ही मिळत नाही. अत्यंत हुशार असलेल्या आपल्या तरुण मुलाचं आक्रमक वागणं पाहून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे अशी त्याच्या वडिलांची ठाम भावना आहे. त्यामुळे तो वाईट नाही हे माहिती असलं तरी तो आपल्या सभ्यतेच्या चौकटीत बसणारा नाही, टोकाचे वागणारा आहे हे ठरवून मुलापेक्षा ते जावयाला जवळ करतात. एका क्षणी वडिलांनी घराबाहेर जा सांगितल्यानंतर आपल्या पत्नीसह बाहेर पडलेला विजय वडिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेतून भारतात परततो. वडिलांवर हल्ला करणाऱ्याचा शोध घेऊन त्याचे काम तमाम करण्याचे कफन बांधून वावरणाऱ्या विजयची रक्तरंजित सूडकथा चित्रपटात पाहायला मिळते. बरं सूडकथा साडेतीन तासांच्या रक्तपातानंतरही थांबत नाही, तर पडद्यावरची ही कत्तल पुढे कशी सुरू राहणार त्याची नव्या खाटकासह दृश्यं दाखवून आवरतं घेते.
बलबीर आणि विजयच्या नात्यातला गुंता जो चित्रपटाच्या सुरुवातीपासून या दोघांनाही लक्षात यायला हवा आणि त्यासाठी त्यांच्यात जो काही संवाद हवा आहे तो तीन-सव्वातीन तासांनंतर काही सेकंदांत येतो. ज्या पद्धतीने या गुंत्याचा शेवट झाला आहे ते सगळं मुसळ केरात अशी जाणीव नायकाला देतो. तोवर त्याने जे पेरलं आहे ते उगवणारच आहे असं सांगत दिग्दर्शकाने पुढच्या अॅनिमल पार्कचाही घाट घातला आहे. बॉबी देओलचा अभिनय कितीही उत्तम असला तरी त्याच्या पात्राचं हसंच झालं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला नायिकेला पूर्वी स्त्रिया कोणत्या पद्धतीच्या वराला निवडायच्या याचा इतिहास नायक सांगतो. आदिम काळात माणूस कळपाने राहू लागला तेव्हा दोन प्रकारचे पुरुष होते. एक अल्फा जो शिकार करायला बाहेर पडायचा आणि शिकार आणून कबिल्यात वाटायचा. आणि दुसरे बाकीचे पुरुष जे फक्त कविता करायचे.. तर त्या अल्फा प्रकारच्या या पुरुषाच्या तत्त्वज्ञानाला भुलून पोरगी पटते. हा अचाट विचारांचा पराक्रमी नायक पत्नीबरोबर वागताना हम करे सो.. अशा थाटात असतो. गाडीचा रंग निवडताना समागमाच्या वेळच्या जखमा दाखवून तंतोतंत त्याच रंगाची गाडी आणायला सांगतो. अशा सगळय़ा कूल गोष्टी करणारा नायक दुसरीकडे आपल्या बहिणीला नवऱ्याच्या दडपशाहीखाली जगू नकोस, स्वतंत्र बाण्याने वाग असा सल्लाही देतो. हा वैचारिक गोंधळ म्हणजे कूलपणा नाही.. हे संबंधितांच्या उशिराने का होईना लक्षात येतं असंही दिग्दर्शक दाखवतो. मात्र अशा विचारसरणीचे कितीतरी आहेत, त्यांची कमी नाही. त्यामुळे ‘कबीर सिंग’ची कथा तिथेच संपली होती, ‘अॅनिमल’ नावाने सुरू झालेली सर्कस मात्र थांबणार नाही आहे.
अॅनिमल
दिग्दर्शक – संदीप रेड्डी वांगा
कलाकार – रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल.