दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. या महान योद्ध्याचा पराक्रम आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे तोही थ्रीडी ॲनिमेटेड रूपात. ‘छावा’ असे या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे नाव आहे.
‘छावा’चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत. त्यांनी हातात तलवार धरली आहे. त्यांच्या चेहऱ्यासमोर ही तलवार दिसत आहे. त्यांच्या पाठी सिंह गर्जना करताना दिसत आहे. सोबतच सिंहाच्या बाजुला राजमुद्रा दिसत असून त्यावर छावा असे लिहिलेले आहे.
या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे दिग्दर्शन भावेश पाटील करत आहेत. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा पुढच्या पिढीपर्यंत अधिक प्रभावी व रंजकपणे पोहचविता येईल या विचाराने ‘छावा’ या थ्रीडी ॲनिमेशनपटाची निर्मिती केली आहे,” असे भावेश म्हणाले.
भावेश प्रोडक्शन आणि शार्कफिन स्टुडिओचे ऋतूध्वज देशपांडे यांच्या प्रयत्नांतून हा थ्रीडी ॲनिमेशनपट साकारला जात आहे. गाणी समीर नेर्लेकर तर संगीत प्रेम कोतवाल यांचे आहे. ध्वनी आरेखन संकेत धोतकर यांचे आहे.