झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक होत चाललेली ही मालिका सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियावर या मालिकेचे बरेस मीम्स आणि विनोद पाहायला मिळतात. या मीम्सवर आता राधिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते हिने प्रतिक्रिया दिली आहे.
‘सोशल मीडियावर राधिका मसालेचे उपरोधिक मीम्स बघते तेव्हा लोकांना असे प्रश्न कसे काय पडू शकतात असं मला वाटतं. खरं तर ही एक प्रकारची प्रसिद्धीच आहे. त्यातल्या उपरोधिकपणाचं मला वाईट वाटत नाही,’ असं अनिता लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना म्हणाली.
सुरुवातीला गृहिणी, साधी भोळी असणारी राधिका सुभेदार जेव्हा मोठ्या कंपनीची मालकीण झाली त्यावेळी सोशल मीडियावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल झाले. ‘राधिका मसाले’चा सर्वत्र बोलबाला झाला. हे विनोद आणि मीम्स पाहून लोकांचं मनोरंजन होतं आहे, मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं अनिता म्हणते.