कॉलेज आठवणींचा कोलाज : अनिता दाते-केळकर, अभिनेत्री

मी नाशिकच्या भिकुसा यमासा क्षत्रिय महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. आणि पदव्युत्तर शिक्षण पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाटय़शास्त्र विषयातून पूर्ण केलं. माझी दोन्ही कॉलेज अप्रतिम होती. त्यांच्या आठवणी माझ्यासाठी आजही ताज्या आहेत. नाशिकच्या कॉलेजमध्ये असताना मी फार काही लेक्चरला बसले नाही. माझा जास्त वेळ कट्टय़ावरच जायचा. ललितला मात्र तसं नव्हतं. तिकडे लेक्चरला बसणं अनिवार्यच होतं. कारण तिकडचं वातावरणच आम्हाला लेक्चरच्या दिशेने खेचून घ्यायचं.

पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत दगडी आहे. आणि त्या इमारतीच्या बरोबर समोर एक टुमदार बंगला आहे. तो संपूर्ण बंगला म्हणजे आमचं डिपार्टमेंट होय. बंगल्यातच एक वर्ग होता. आमचं स्वतंत्र ग्रंथालय होतं.

बंगल्याच्या समोर भलं मोठं अंगण होतं. त्या अंगणात बऱ्याचदा आमच्या नाटकाच्या तालमी चालायच्या. सकाळी सात वाजता व्यायाम वा संगीत रियाजने कॉलेजची सुरुवात व्हायची. रात्री १० वाजेपर्यंत कॉलेज चालायचं. कॉलेजात वर्षांला दहा विद्यार्थीच असायचे. त्यात मी आणि अलिबागवरून आलेली एक अशा आम्ही दोनच मुली होतो. बाकी आठ मुलं. वेगवेगळ्या गावांतून आलेली.

त्यामुळे आम्ही दहा जण एका कुटुंबासारखे राहायचो. आणि नाटकात असं असतं की तुम्हाला सर्वाशी ओळख आणि सलगी करून घ्यावीच लागते. कॉलेजात पूर्णपणे कला क्षेत्राशी निगडित देवाणघेवाण असायची. कॉलेजचा पहिला दिवस एकमेकांशी अर्धवट ओळखी करून घेण्यात गेला. आम्ही सर्व दहा विद्यार्थी एकत्र कॉलेजात जेवलो. पहिल्याच दिवशी आमच्या सरांनी आम्हाला सादरीकरण करायला सांगितलं होतं. त्यामुळे कोणी गाणं सादर केलं. कोणी अभिनय करून दाखवला. असे एकमेकांच्या अंगी असलेले गुण बघण्यातच तो दिवस गेला. ललित कला केंद्रात मला कॉलेजात अभ्यासाव्यतिरिक्त फार मजा करायला मिळाली नाही. जी मजा केली ती केवळ थिएटरमध्येच. तो अभ्यासाचाच एक भाग होता. आमचं लेक्चरसुद्धा बऱ्याचदा हिरव्यागार झाडाखाली व्हायचं. विद्यापीठाचं गार्डन आमच्या बंगल्याच्या मागे होत. तिथे आम्ही अभ्यास करायचो. त्यामुळे मी इथे चार भिंतींमध्ये बसून अभ्यास केलेला मला आठवत नाही. आम्हाला कॉलेजात प्रोजेक्टसुद्धा कलेशीच निगडित असायचे. म्हणजे नाटक बघायला जा. तिथे एका कलाकाराची मुलाखत घेऊन या वा आपल्या इथे एखादं नाटक घेऊन या, वगैरे. त्यामुळे या दोन वर्षांत आम्ही सर्वानी मिळून एकत्र खूप ‘सेल्फस्टडी’ केली.

पुणे विद्यापीठाची भव्यदिव्य जयकर लायब्ररी आहे. त्या लायब्ररीत पाऊल ठेवल्यावरच आपल्याला जाणवत की आपलं आयुष्य खूप लहान आहे. त्या लायब्ररीत मी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक नाटकं वाचली. मग ती संस्कृत भाषेतून मराठीत भाषांतरित झालेली असायची आणि कालिदासाची नाटकंसुद्धा मी वाचली. जगभरातील नाटकांची आणि तिथल्या थिएटरची माहिती मला ललित केंद्रामुळे झाली. उमेश जगताप आणि सुहास शिरसाट हे माझे वर्गमित्र होते. चेतन दातार आणि सतीश आळेकर हे माझे गुरू.

कॉलेजमध्ये खवय्येगिरी करण्याची संधी केवळ रविवारी मिळायची. सोमवार ते शनिवार मेस आमचे लाड करायची. रविवारी सकाळी आम्हाला काही तरी गोडधोड खाऊ  मिळायचा. संध्याकाळी मेस बंद असायची. त्यामुळे रविवारी संध्याकाळी आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येऊन बजेटमध्ये खानपान करायचो.

शाळेत असताना मला कॉलेजचं आकर्षण होत. कॉलेज पूर्ण झाल्यावर मी खूप तटस्थ होते. ललित कला केंद्र सोडल्यावर नंतरचे पाच महिने मला जरा जड गेले. पण ललित सोडताना कला आणि जीवन वेगळं नाही, हे भान मला आलं. ललितमध्ये शिकणं झालंआणि तिथं शिकलेलं सारं आता प्रत्यक्षात जीवनात उतरवायचं होतं. ललितच्या ज्ञानाचा हा वसा मी नेहमीच जपत आले आहे. अखंड नाटकाचं, कलेचं ज्ञानहोत्र देणारं हे केंद्र आजही हृदयाशी आहे.

शब्दांकन : मितेश जोशी

Story img Loader