फॅशन जगताचे वाढते वेड पाहता हल्लीच्या दिवसांमध्ये मॉडेलिंग क्षेत्राविषयी अनेकांमध्येच फार उत्सुकता पाहायला मिळत आहे. एखादी सुंदर मॉडेल ज्यावेळी रॅम्पवर चालू लागते त्यावेळी तिचे सौंदर्य वाखाणण्यात येते. अशीच एक सौंदर्यवती सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. रॅम्पवरील तिचा अॅटीट्युड आणि फॅशन जगतात तिचा वावरसुद्धा अनेकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. ही मॉडेल म्हणजे अंजली लामा. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करण्याचे अंजलीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. अंजली लामाच्या नावाचा इतका गाजावाजा होण्याचे कारण म्हणजे, अनेकांनाच आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी अंजली ही पहिली तृतीयपंथी सौंदर्यवती आहे जी सध्या प्रचंड चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजलीची मॉडेल बनण्यापर्यंतची कथा एले या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही अंजलीची चर्चा रंगत आहे. नेपाळमधील नुवाकोट येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंजलीची कथा रोजच्या जीवनातील वास्तवाचे दर्शन घडवणारीच आहे. ‘मला तर लोक असंही म्हणायचे की, हा मुलगा आहे, मुलीसारखा का वागतो? यावर मी पुन्हा पुन्हा स्वत:ची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मी मुलासारखे कपडेही घालून पाहिले’, असे अंजली एलेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाली.

दरम्यान, वयाच्या एका टप्प्यावर असताना अंजली एका हॉटेलमध्ये काम करु लागली, सोबतच ती नेपाळच्या एका वाहिनीवर तृतीयपंथींवर आधारित एक कार्यक्रमही करत होती. कालांतराने ‘ब्लू डायमंड सोसायटी’शी संपर्क साधल्यानंतर तिने स्वत:ची खरी ओळख सर्वांसमोर आणत त्याच अनुशंगाने जगण्याचा निर्णय घेतला. ‘मी २००५ ला तिथून बाहेर पडले. तो न विसरता येण्यासारखा अनुभव होता. त्यावेळी मला ज्या नावांनी संबोधलं जायचं त्याचा उल्लेख मला करायचा नाहीये’, असे म्हणत अंजलीने या मुलाखतीदरम्यान सांगितले की ‘माझ्या कुटुंबात जेव्हा ही परिस्थिती कळली तेव्हा त्यांच्यासाठी मी मेले होते. फक्त माझी आईच माझ्या पाठिशी उभी राहिली होती’, असे अंजलीने स्पष्ट केले.

छाया सौजन्य- एले

जीवनातील या खडतर वळणांवर मात करत अंजली लामाने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपरमॉडेल होण्याचा निर्धार करत त्या वाटेवर चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, ‘लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट २०१६’च्या ऑडिशनमध्ये अंजलीची निवडही करण्यात आली नव्हती. त्यावेळी आपण हतबल झाल्याचेही अंजलीने कबूल केले. पण त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने तयारी करत आणि उणीवा दूर करत स्वत:मध्ये बदल केला आणि अधिक प्रभावीपणे स्वत:चेच प्रतिनिधीत्व परिक्षकांसमोर करत आज हे यश मिळवले आहे. या ३२ वर्षीय सौंदर्यवतीची आणखीन एक सुप्त इच्छा म्हणजे तिला सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्यासाठी रॅम्पवॉक करायचे आहे.

छाया सौजन्य- ट्विटर/ एले इंडिया
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali lama the first transgender model to walk the ramp for lakme fashion week