‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये अंकिताने झलकारीबाईंची भूमिका वठविली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून दिग्दर्शन क्षेत्रातला कंगनाचा पहिला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. या निमित्ताने अंकितानेदेखील कंगनावर स्तुतीसुमनं उधळल्याचं पाहायला मिळालं.
बॉलिवूडमध्ये कंगनाच माझी गॉडफादर आहे, असं काही दिवसांपूर्वी अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर अंकिताने पुन्हा एकदा कंगनाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ”मणिकर्णिका’च्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र या पहिल्याच प्रयत्नात तिने स्वत: ला सिद्ध करुन दाखवलं आहे. कंगनाचा सेटवरचा वावर हा पाहण्याजोगा होता. तिच्यात प्रचंड उर्जा असून तिचं व्यक्तीमत्व साऱ्यांनाच भारावून टाकतं. तिच्यात एक वैशिष्ट आहे. ती जे काही करते त्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करते’, असं अंकिता म्हणाली.
पुढे ती असंही म्हणते, ‘कंगनाने आता दिग्दर्शकीय क्षेत्रात स्वत: ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे यापुढेही ती असाच यशाचा आलेख चढत जाईल आणि तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा कायमच तिच्या सोबत असतील’.
दरम्यान, २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणजे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटालाही कंगनाच्या मणिकर्णिकाने मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे.