प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो की ती किंवा तो सध्या काय करत असेल ? ह्या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडीओजचा आगामी मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे  ‘ती सध्या काय करते’. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि ‘होणार सून मी या घरची’ मधून घराघरांत पोहोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाश सोहळा मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये रंगला. या शानदार सोहळ्यात चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रकाशित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने, सहनिर्मात्या पल्लवी राजवाडे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, हृदित्य राजवाडे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर, निर्मोही अग्निहोत्री, तुषार दळवी आणि अनुराधा राजाध्यक्ष आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाला की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या  प्रेमात पडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि ह्याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हा अनुराग इतकाच तन्वीचाचित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे.

‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी ह्याला अपवाद नाहीत. ती सध्या.. जितकी ह्या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि ह्या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न सतीश राजवाडेने केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे,अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush chaudhary tejashri pradhans upcoming movie ti sadhya kay karte