अभिनेता अंकुश चौधरीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण अंकुशची पत्नी दीपा परब देखील उत्तम अभिनेत्री आहे. मागच्या काही वर्षांपासून कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात न दिसलेली दीपा परब लवकरच झी मराठीवरील एका नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. तर दुसरीकडे काही नव्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशाच एका नव्या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या आधी दीपाने बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. दीपा परब आता ‘तू चाल पुढं’ या नव्या मराठी मालिकेत दिसणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘तू चाल पुढं’ ही मालिका एका गृहिणीची आहे जिची खूप मोठी स्वप्न मोठी आहेत. ही स्वप्न पूर्ण करत असताना येणारे अडथळे पार करत तिला पुढे जायचं आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना घर-संसारात रमलेल्या एका गृहिणीची कथा पाहायला मिळणार आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या मालिकेची तुलना ‘आई कुठे काय करते’ मालिकेशी केली आहे.
आणखी वाचा-छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी राणादाच्या वहिनीसाहेब सज्ज, कधी प्रदर्शित होणार नवी मालिका?
दरम्यान दिपा परबने अनेक जाहिराती आणि हिंदि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘छोटी माँ’, ‘थोडी खुशी थोडी गम’, ‘रेत’ या हिंदी मालिकांमध्ये दीपाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता ‘तू चाल पुढं’ या नव्या मालिकेत दीपा परब मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत धनश्री काडगावकर, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे धनश्री काडगावर पुन्हा एकदा या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसणार आहे.