‘डबल सीट’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अंकुश चौधरीने आत्तापर्यंतचा त्याचा ‘डीएसपी’वाला रांगडा नायक किंवा त्याच्या विनोदी भूमिका बाजूला ठेवून ‘मध्यम’वर्गीय रस्ता निवडला. म्हणजेच, मध्यमवर्गीय-सरळ नाकाने चालणारा, नोकरी करून संसार चालवण्याचे स्वप्न पाहणारा असा नायक रंगवला. ‘दगडी चाळ’मध्ये पुन्हा एकदा असाच नायक रंगवणाऱ्या अंकुशने यात मात्र आपली अॅक्शन हिरोची प्रतिमाही जपली आहे. पण, ‘दगडी चाळ’ हा शब्द उच्चारल्यानंतर डॉन अरुण गवळी आणि त्याच्या कारवाया मनात फेर धरतात. त्यामुळे हा चित्रपट कुठेतरी ‘डॅडी’ नावाने ओळखल्या गेलेल्या अरुण गवळीसारख्या गुंडाचा चरित्रपट आहे, अशी शंका मनात येते. अंकुशने मात्र हा अरुण गवळीचा चरित्रपट नसल्याचे ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना स्पष्ट केले.
‘दगडी चाळ’ हे पुन्हा एक ९६च्या आसपासच्या मुंबईचे प्रतीक आहे. सर्वसामान्य सुशिक्षित तरुणालाही त्या वेळी नोकरीसाठी वणवण केल्यावर ‘नो व्हेकन्सी’चीच पाटी पाहावी लागत होती. त्यातल्या कित्येकांनी वडापावची गाडी टाकली, चहाच्या टपऱ्यांवर काम केलं, पण प्रत्येकालाच उद्योग करता आला असंही नाही. त्या वेळी अशा अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अरुण गवळीसारख्या गुंडाच्या ‘दगडी चाळी’तील साम्राज्याचाच आधार वाटला होता. कित्येक तरुणांनी पैशासाठी म्हणून हा वाममार्ग निवडला होता. त्या वेळच्या मुंबईची, तिथल्या तरुणांची कथा हा ‘दगडी चाळ’ या चित्रपटाचा केंद्रबिंदू असल्याचे अंकुशने सांगितले. या चित्रपटात ‘डॅडी’ची भूमिका मकरंद देशपांडे यांनी केली आहे. तर अंकुशने सूर्या या तरुणाची भूमिका केली आहे.
सूर्याचे एका तरुणीवर प्रेम आहे. एरव्ही कोणत्याही गुंडगिरीच्या वाटेने न जाणाऱ्या सूर्याची स्वप्नं ही इतर तरुणांसारखीच साधी आहेत. पण त्या वेळी मुंबईत अरुण गवळीसारख्या गुंडांचंच साम्राज्य होतं आणि त्यांच्या त्या साम्राज्याची झळ कित्येक सामान्यांना बसत होती. त्यात जे कमकुवत होते ते होरपळले गेले. ज्यांचे संस्कार, मूल्य शाबूत होती त्यांनी वाममार्ग न निवडता आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष केला. सूर्या हा या संघर्ष करणाऱ्या तरुणांमधलाच एक आहे. मात्र, जेव्हा अशा गुंडाच्या कारवायांमध्ये तो विनाकारण ओढला जातो तेव्हा काय होतं याचं चित्रण या चित्रपटात केलं आहे. या भूमिकेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा ‘अॅक्शन हिरो’ साकारायची संधी घेतल्याचं अंकुश आवर्जून सांगतो. आपल्या प्रेक्षकांना मनोरंजन करणारे चित्रपटही हवे आहेत. त्यांना आपल्या चित्रपटात ‘हिरो’ हवाच असतो. ती संधी या चित्रपटात होतीच, त्याबरोबरीने चित्रपटाची कथा ज्या पद्धतीने मांडली आहे ती कोणत्याही प्रेक्षकाला आवडेल अशी असल्याने आपण हा चित्रपट स्वीकारल्याचे अंकुशने सांगितले.
या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच मकरंद देशपांडेसारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर काम केलं आहे. ‘डॅडी’ हा या चित्रपटात एक खलनायकी वृत्ती म्हणून येतो. प्रत्येक चित्रपटात हिरोसमोर ‘व्हिलन’ असतो. मग तो अन्य कोणीतरी घेण्यापेक्षा वास्तवात ज्याचा दबदबा होता. ज्या काळात या चित्रपटाची कथा घडते तेव्हा ज्याच्या खलनायकी कारवायांनी मुंबईला वेठीस धरलं होतं अशा ‘डॅडी’लाच इथे खलनायक म्हणून समोर उभं केल्याचं तो म्हणतो. मकरंद या भूमिकेसाठी एकदम चपखल होता. ‘सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट’च्या निमित्ताने त्याच्याशी दोस्ती झाली. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. शिवाय, तो कित्येक वर्षे रंगभूमीशी जोडलेला कलाकार असल्याने त्याच्या अभिनयाबद्दल, देहबोलीबद्दल प्रश्नच नव्हता. त्याच्यासारख्या सक्षम अभिनेत्याबरोबर काम करताना म्हणूनच ‘साद-प्रतिसाद’ अशी अभिनयाची जुगलबंदी करायची संधी मिळाली. त्यामुळे आणखीनच मजा आली, असे अंकुशने सांगितले. अंकुशच्या चाहत्यांना आवडेल असा हा चित्रपट असल्याने ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.