भयपट म्हटले की चटकन आपल्या डोळ्यांसमोर ‘रात’, ‘राज’, ‘रागिनी एम.एम.एस.’, ‘महल’, ‘एक थी डायन’ यांसारखे काही चित्रपट उभे राहतात. ओढूनताणून तयार केलेले कथानक, मेणबत्ती घेऊन पांढऱ्या साडीत फिरणारी बाई किंवा एखादी जुनाट हवेली या दृश्यांपलीकडे या चित्रपटांमध्ये काही दिसतच नाही. त्यामुळे यांना भयपट म्हणावे की विनोदपट अशी शंका निर्माण होते. दर्जेदार सिनेमांची मायभूमी म्हणून गौरवली जाणारी हॉलीवूड सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. तिथेही आल्फ्रेड हिचकॉक, केन्टीन टेरेन्टीनो, टॉमी विरकोला, गिआमी डेल टोरो अशा काही मोजक्या दिग्दर्शकांना सोडले तर जवळपास सर्वाचीच पाटी कोरी आहे; परंतु या कोऱ्या पाटीवर २०१३ साली जेम्स स्वान हे नाव लिहिले गेले. आल्फ्रेड हिचकॉकच्याच पावलांवर पाऊल ठेवत पुढे आलेल्या या दिग्दर्शकाने ‘द कॉन्ज्युरिंग’ या भयपट मालिकेच्या माध्यमातून माणसाच्या अंतरंगात दडलेली भीती पुन्हा एकदा अक्षरश: ओढून बाहेर काढली. जगभरातील जवळपास ३७ पेक्षा अधिक लोक ही भयपट मालिका पाहताना मृत्युमुखी पडले आहेत. यावरूनच ‘द कॉन्ज्युरिंग’ची दहशत आपल्या लक्षात येते. सध्या या मालिकेतील सहावा चित्रपट ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ चर्चेत आहे.

या मालिकेत ‘द कॉन्ज्युरिंग’, ‘अ‍ॅनाबेल’, ‘द कॉन्ज्युरिंग २’, ‘अ‍ॅनाबेल २’, ‘द नन’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ असे एकूण ६ चित्रपट आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला कोणत्याही चित्रपट मालिकेत सीक्वेल किंवा प्रीक्वेलचा खेळ दिसतो, परंतु ‘कॉन्ज्युरिंग’मध्ये ‘स्पीन ऑफ’ या प्रकाराचा वापर केल्यामुळे ही मालिका पाहताना अनेकदा त्यातील कथानकांच्या क्रमवारीच्या बाबतीत आपला गोंधळ होतो. तसेच म्हणायला या सर्व भूतपटांमधील कथानक एकमेकांपेक्षा भिन्न आहे खरे, परंतु तरीही यांना एकाच कथानकात गुंफल्यामुळे हा गोंधळ आणखीनच वाढतो. मात्र, गेली सहा वर्षे सुरू असलेला हा गोंधळ कमी व्हावा यासाठी या चित्रपट मालिकेची मुळं शोधून काढूयात..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’ची सुरुवात १८६३ साली बशिबा नामक एका बाईमुळे होते. जादूटोण्यात पटाईत असलेली ही बाई सैतानी आत्म्याला खूश करण्यासाठी आपल्या चार दिवसांच्या बाळाचा बळी देते, परंतु त्यानंतरही सैतान खूश होत नाही. त्यामुळे ती स्वत:चा जीव देते. जादूटोणा व बळी प्रकरणामुळे तिचे राहते घर शापित होते. त्यानंतर जे कुटुंब त्या घरात राहायला येते त्या प्रत्येक कुटुंबाचा बशिबाचा दुष्ट आत्मा फडशा पाडण्यास सुरुवात करतो.

पुढे १९४३ मध्ये बशिबाच्या घरात सॅम्युअल मुलीन्स आणि इथर ग्रेव्ह हे जोडपे राहायला येते. त्यांना अ‍ॅनाबेल नावाची एक सात वर्षांची मुलगी असते. या मुलीचे कार अपघातात निधन होते. अ‍ॅनाबेलच्या अचानक झालेल्या निधनाचा तिच्या आईवडिलांना जोरदार धक्का बसतो. त्याच दरम्यान त्यांना जादूटोण्याची माहिती मिळते. मुलीच्या विरहाने वेडे झालेले हे मातापिता जादूटोण्याच्या माध्यमातून अ‍ॅनाबेलच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, एका अज्ञात सैतानी आत्म्याशी त्यांचा सामना होतो. हा आत्मा अ‍ॅनाबेलच्या बाहुलीत जातो व त्यांना त्रास देण्यास सुरुवात करतो. त्यानंतर एका तांत्रिकाच्या मदतीने या बाहुलीला एका मंतरलेल्या कपाटात बंद केले जाते.

१२ वर्षांनंतर १९५५ साली सॅम्युअल व इथर यांनी सोडलेल्या घरात एक नवीन कुटुंब राहायला येते. या कुटुंबात सिस्टर शॉर्लेट आणि सहा अनाथ मुली असतात. या मुलींमध्ये जेनिस नामक एक अपंग मुलगी असते. १२ वर्षांपूर्वी कपाटात बंद करून ठेवलेली ती झपाटलेली बाहुली याच अपंग मुलीच्या मदतीने बाहेर येते. बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा त्या सैतानी आत्म्याचा विकृत खेळ सुरू होतो. हा आत्मा जेनिसवर पूर्ण नियंत्रण मिळवतो व तिच्या मदतीने घरातील इतर मुलींना मारण्यास सुरुवात करतो. घरात होणाऱ्या या घडामोडींची माहिती सिस्टर शॉर्लेटला मिळताच ती एका तांत्रिकाला बोलावते व त्याच्या मदतीने जेनिसच्या शरीरातील सैतानी आत्मा बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, जेनिस घर सोडून पळून जाते. घर सोडल्यानंतर जेनिस एका अनाथ आश्रमात अ‍ॅनाबेल या नावाने राहू लागते. अर्थात तिच्या शरीरातील आत्मा बाहेर काढण्यात तो तांत्रिक अयशस्वी ठरतो. तिथे एक नवीन कुटुंब तिला दत्तक घेते. त्या बाहुलीतून जेनिसच्या शरीरात जाणारा आत्मा कोणाचा होता? या प्रश्नचिन्हावर कथानकाचा शेवट होतो. सैतानी आत्म्याने झपाटलेल्या याच बाहुलीभोवती संपूर्ण ‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’ फिरताना दिसते. हे कथानक ‘अ‍ॅनाबेल: क्रिएशन’ या चित्रपटात घडते. हा चित्रपट ‘कॉन्ज्युरिंग’ मालिकेतला चौथा चित्रपट आहे; परंतु खऱ्या अर्थाने याच चित्रपटातून मूळ कथानकाची सुरुवात होते.

जेनिसची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा १२ वर्षांचा काळ लोटतो. १९६७ साली त्याच घरात जॉन व मिया हे एक नवीन कुटुंब राहायला येते. घरात सफाई करताना त्यांना एक बाहुली सापडते. याच बाहुलीत कधीकाळी एका सैतानी आत्म्याचे वास्तव्य होते. आता हा आत्मा जेनिसच्या शरीरात आहे आणि योगायोग म्हणजे जेनिस अ‍ॅनाबेल या नावाने त्यांच्या शेजारच्याच घरात राहत असते. तिथे तिचा सैतानी खेळ सुरू असतोच; परंतु एके दिवशी हा खेळ मियाच्या नजरेस पडतो आणि त्यानंतर जेनिस ऊर्फ अ‍ॅनाबेल या नवीन कुटुंबाच्या मागे लागते. ती त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करते; परंतु मोक्याच्या क्षणी पोलीस त्यांच्या मदतीला धावून येतात व त्यांचा जीव वाचतो. परंतु या गडबडीत तो आत्मा जेनिसला मारतो व पुन्हा एकदा त्या बाहुलीत वास्तव्य करण्यास सुरुवात करतो. हे कथानक ‘अ‍ॅनाबेल’ या चित्रपटात घडते. हा चित्रपट ‘कॉन्ज्युरिंग’ मालिकेतला दुसरा चित्रपट आहे.

जॉन व मिया घर सोडून गेल्यानंतर ११ वर्षांनी १९७१ साली तिथे रॉजर पेरॉन, कॅरोलिन व त्यांची पाच मुले हे एक नवीन कुटुंब वास्तव्यास येते. या घरात अ‍ॅनाबेल नामक झपाटलेली बाहुली असतेच. त्या बाहुलीतील आत्मा आपले विकृत उद्देश पूर्ण करण्यासाठी जेनिसप्रमाणेच आता कॅरोलिनच्या शरीराचा वापर सुरू करतो. मग रॉजर सुरू असलेल्या या अनपेक्षित घटना थांबवण्यासाठी लोरेन वॉरेन नामक एका प्रख्यात पॅरानॉर्मल इनवेस्टिगेटरला बोलवतो. त्याच्या मदतीने त्या आत्म्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. हे कथानक ‘द कॉन्ज्युरिंग’ या चित्रपटात घडते. हा चित्रपट ‘अ‍ॅनाबेल युनिव्हर्स’मधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने भयपटांचे एक नवीन पर्व सुरू केले.

पेरॉन कुटुंबाने पलायन केल्यानंतर पाच वर्षांनी तिथे हॉडसन कुटुंब राहायला येते. त्यांच्या बाबतीतही त्याच घटना घडतात ज्या इतर कुटुंबांच्या बाबतीत घडल्या होत्या. मग पुन्हा एकदा पॅरानॉर्मल इनवेस्टिगेटर लोरेन वॉरेनला तेथे बोलावण्यात येते. तो संपूर्ण घराचा पुन्हा एकदा तपास करतो. या घरात नेमके चाललेय काय? इथे वास्तव्य करणारी कुटुंबं घर सोडून पळतात? इथे अशा कोणत्या दुष्ट शक्तींचा प्रभाव आहे? वॉरेन अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यास सुरुवात करतो. दरम्यान बिल विल्किन्स हे एक नवीन नाव त्याला कळते. हा विकृत प्रवृत्तीचा व्यक्ती त्या घराचा पहिला मालक होता आणि त्याचाच सैतानी आत्मा हा दुष्ट खेळ खेळत असावा असा निष्कर्ष काढला जातो. हे कथानक ‘द कॉन्ज्युरिंग २’ या चित्रपटात घडते. हा चित्रपट ‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’मधील तिसरा चित्रपट आहे; परंतु २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द नन’ या भयपटामुळे ‘द कॉन्ज्युरिंग २’मध्ये काढलेले सर्व निष्कर्ष फोल ठरतात. कारण बिल विल्किन्सच्या शरीरात वालक नामक एका ननचा आत्मा असतो; परंतु हे कथानकही अर्धवटच आहे. कारण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’मध्ये पुन्हा एकदा या कथानकाला एक नवीन वळण लागते.

‘कॉन्ज्युरिंग’ ही संपूर्ण मालिका एक अज्ञात सैतानी आत्मा व अ‍ॅनाबेल नामक रहस्यमय बाहुली या दोघांभोवती फिरताना दिसते. तो आत्मा बाहुलीला नियंत्रित करतो की बाहुली आत्म्यांना नियंत्रित करते याबद्दल अद्याप पुरेशी माहिती कोणत्याही चित्रपटात दिलेली नाही. त्यामुळे ‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’मधील प्रत्येक नवीन चित्रपट पाहताना आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. त्यातील गोंधळाची परिस्थिती कायम ठेवण्याचा दिग्दर्शक-निर्मात्यांचा निर्णय या चित्रपट मालिकेसाठी यशस्वी ठरला आहे. त्यामुळे या प्रत्येक चित्रपटाने आजवर तिकीटबारीवर चांगली कमाई करत भयपटांमधले आपले स्थान पक्के केले आहे. ‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’मधील भयपट पाहताना ‘द नन’, ‘अ‍ॅनाबेल क्रिएशन’, ‘अ‍ॅनाबेल’, ‘द कॉन्ज्युरिंग’, ‘द कॉन्ज्युरिंग – २’ आणि ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ या क्रमांकाने पाहिल्यास आपल्या मनात कथानकाबद्दल गोंधळ राहणार नाही आणि अधिक उत्तम प्रकारे या चित्रपटांचा आनंद घेता येईल.