सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या १०५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती, लेखन-दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे असून अभिनेता सुनील बर्वे बाबुजींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भक्तिसंगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत अशा हरएक संगीत प्रकारात सुधीर फडके यांनी अलौकिक कार्य केले आहे. त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आजची तरुण पिढीही तितक्याच आवडीने गुणगुणते. संगीत क्षेत्रात बाबुजी या नावाने ओळखल्या गेलेल्या सुधीर फडके यांचा एक उमदा तरुण संगीतकार ते प्रतिभावंत गायक – संगीतकार हा प्रवास खचितच सोपा नव्हता. बाबुजींची पडद्यामागची कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला असता यशापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीतला संघर्ष, त्यांच्या व्यक्तित्वातले अनेक पैलू उलगडत गेले. त्यांची जीवनकथा पुढच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे आणि म्हणून या चरित्रपटाच्या निर्मितीचा विचार केला. गेली तीन वर्षे या चित्रपटाच्या निमित्ताने अभ्यास – संशोधन सुरू आहे, अशी माहिती योगेश देशपांडे यांनी दिली.

बाबुजींचा चरित्रपट म्हणजे अर्थातच यात संगीताचा भाग मोठा असणार. या चित्रपटात २५ गाणी असल्याचे योगेश यांनी सांगितले. यातली बहुतांशी गाणी बाबुजींच्या मूळ आवाजातच चित्रपटातही अनुभवायला मिळणार आहेत. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून येत्या डिसेंबरअखेरीस चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास योगेश देशपांडे यांनी व्यक्त केला.