रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिकपट, त्यातही शिवकालीन इतिहासातील विविध घटना आणि शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींचे चित्रण करणारे मराठी चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मग त्यात विषयांची पुनरावृत्ती आढळते, क्वचितप्रसंगी आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबरोबर नव्याने आलेल्या चित्रपटाची तुलना होते, तर अनेकदा ऐतिहासिक संदर्भाच्या बाबतीत हा खरा की तो खरा.. असाही गोंधळ उडतो. हे सगळं नमनालाच मांडण्याचं कारण म्हणजे ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहताना वर उल्लेखलेल्या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात. मुळात एकाच विषयावरचे दोन वेगळे चित्रपट पाहताना दिग्दर्शकीय दृष्टिकोन आणि मांडणीतला फरक किंवा कथा रंगवण्याच्या शैलीतील वेगळेपण ही प्रेक्षकांसाठी औत्सुक्याची गोष्ट असते. त्याचा विचार करता अभिजीत शिरीष देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील वैयक्तिक नाते, त्यांचे दोघांचेही अंतरंग उलगडून दाखवण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वेगळा ठरतो. मात्र ते चित्रपटाचे मुख्य कथानक नसल्याने वा तोच पदर धरून कथा पुढे नेता न आल्याने मग घोडिखड आपल्या रक्ताच्या बलिदानाने पावन करणाऱ्या शूरवीरांची आधी ऐकलेली, पाहिलेली गाथाच प्रेक्षकांना अनुभवायला मिळते.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने गाजवलेली पावनिखडीची कथा हाच ‘हर हर महादेव’चा मुख्य कथाभाग आहे अशी आपली मूळ धारणा असते. मात्र चित्रपटाची सुरुवातच बाजीप्रभू देशपांडे कोण होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली हे दाखवण्यापासून होते. पुढे बाजीप्रभूंची आणि शिवाजी महाराजांची गाठभेट कशी झाली? ज्या बांदल देशमुखांचे कारभारी म्हणून बाजीप्रभू देशपांडे काम पाहत होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येण्याच्या प्रस्तावाला दिलेला नकार वगैरे घटनाक्रम उलगडत जातो. स्वराज्याची लढाई नुकतीच कुठे सुरू झाली होती.. तेव्हाचा हा काळ अत्यंत वेगवान घटनांनी भरलेला आहे. पावनिखडीचा थरार घडण्याआधी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीसाठी छोटय़ा छोटय़ा मराठी सरदारांना एकत्र आणत सुरू केलेले प्रयत्न, अफझलखानाने उचललेला विडा, त्याचा वध अशा किती तरी महत्त्वाच्या ठळक घटनांचा हा काळ.. या सगळय़ा घटनाक्रमात महाराजांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक मावळय़ाची, शूरवीराची आपली एक स्वतंत्र कथा आहे. बाजीप्रभूंच्या बाबतीतही ती निश्चितच आहे. त्यामुळे चित्रपटातील पूर्वार्धच नव्हे तर उत्तरार्धाचाही बराचसा भाग हा बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज यांच्यात हळूहळू घट्ट होत गेलेले बंध, नकारातून आलेला होकार आणि नुसत्याच कर्तव्यभावनेपासून ते स्वराज्याचे इमान अंगी बाणण्यापर्यंतचा बाजीप्रभूंचा प्रवास हा खूप मोठा भावनापट आपल्यासमोर उलगडत जातो. उत्तरार्धात मग शेवटचा एक मोठा भाग आपल्याला महाराजांचे पन्हाळय़ावर अडकणे. सिद्दीची खेळी, पन्हाळय़ावरून सुटण्यासाठी महाराजांनी आखलेली आणि फसलेली रणनीती, बाजीप्रभूंनी सूत्रे हातात घेत शिवा काशिदच्या मदतीने महाराजांना पन्हाळय़ावरून निघून जाण्यासाठी केलेले प्रयत्न ते प्रत्यक्ष घोडिखडीतील लढाई असा खूप मोठा घटनाक्रम एकाच चित्रपटात हाताळण्याचे धाडस लेखक – दिग्दर्शक अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले आहे. एवढा मोठा घटनाक्रम हाताळताना आपल्याला नेमके काय दाखवायचे आहे, काय सांगायचे आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं होऊन बसतं. अन्यथा अनेक गोष्टी आकर्षक शैलीत उलगडत नेणारा चित्रपट एवढीच ठळक नोंद पाहणाऱ्याच्या मनात उरते. ‘हर हर महादेव’ पाहताना नेमकी हीच भावना मनात येते.

बाजीप्रभूंबद्दलची वैयक्तिक माहिती आणि ज्या हिरडस मावळशी, तिथले सरदार बांदल – देशमुखांशी ते जोडले गेले होते तिथपासूनचा इतिहास अजूनही प्रेक्षकांच्या फारसा परिचयाचा नाही. त्यातही बाजीप्रभू यांचे त्यांची पत्नी सोनाबाई, मुलगा महादजी यांच्याबरोबरचे नातेही यात उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र एका वळणावर या सगळय़ा गोष्टी मागे पडतात आणि आपल्याला परिचित असलेला इतिहास आपण पुन्हा पाहू लागतो. त्या वेळी पुनरावृत्ती हा एक घटक आपल्यावरचा प्रभाव कमी करणारा ठरतो. दुसरं म्हणजे अफझलखानाच्या वधाचा प्रसंग असो वा बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज यांच्या नात्यातील सुरुवातीचा विसंवाद असो.. हे चित्रण ऐतिहासिक संदर्भाना धरून असण्यापेक्षा त्याला अतिरंजित काल्पनिकतेचा चढवलेला साज खटकतो. बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गोष्ट त्याच खिंडीत त्यांच्याबरोबर लढलेल्या बांदल बंधूंबद्दल काहीच सांगत नाही. अफझलखानाचा वध, पन्हाळय़ाचा वेढा अशा कित्येक घटनांमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचाही उल्लेख कुठेच येत नाही. असे कित्येक महत्त्वाचे दुवे या कथाचित्रणात सापडत नाहीत. नाही म्हणायला चटकदार संवाद, उत्तम अभिनय आणि एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याची धडपड, तांत्रिक सफाई या गोष्टींमुळे ‘हर हर महादेव’ एक आकर्षक, भव्यदिव्य चित्रपट म्हणून यशस्वीपणे पडद्यावर उतरला आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी महाराजांच्या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांची देहबोली याविषयी एक प्रतिमा जनमानसात कायम आहे, त्या प्रतिमेत आपण सहजी बसत नाही हे लक्षात घेऊन अभिनय आणि संवादफेकीतून त्यांनी महाराजांची भूमिका चोख वठवण्याचा प्रयत्न केला आहे. शरद केळकर यांनीही बाजीप्रभूंच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजात व्यक्त होणारी सह्याद्रीची कथाव्यथा अशा किती तरी वेगळय़ा गोष्टी या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळतात. मात्र ऐतिहासिक संदर्भ, तत्कालीन भाषा अशा बाबींवर अधिक मेहनत घ्यायला हवी होती हे जाणवत राहतं. पावनिखडीत पराक्रम गाजवणारे बाजीप्रभू आणि हिंदूवी स्वराज्य उभारणारे शिवाजी महाराज या दोन शौर्यमूर्तीच्या अंतरंगाचा, त्यांच्या भावविश्वात डोकावण्याचा चित्रपटात केलेला प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे.

हर हर महादेव

दिग्दर्शक – अभिजीत शिरीष देशपांडे, कलाकार – शरद केळकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, शरद पोंक्षे, सायली संजीव, किशोर कदम, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another heroic story historical film har har mahadev movie to the audience ysh