‘बादशाहो’ चित्रपटातील भूमिकांबद्दल रोज नवीन माहिती मिळतेय, नवीन पोस्टर प्रदर्शित होत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर २० जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याआधी त्यातील भूमिकांचे विविध पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अजय देवगण, इमरान हाश्मी, इशा गुप्ता, इलियाना डिक्रूझ आणि विद्युत जामवाल यांचा लूक पाहायला मिळाला. चित्रपटातील सहाव्या आणि महत्त्वाच्या भूमिकेचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. या पोस्टरमध्ये अभिनेता संजय मिश्रा बसलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जॅकेटमध्ये बऱ्याच किल्ल्या दिसत आहेत. त्यामुळे संजय मिश्राची चित्रपटातील भूमिका अत्यंत रंजक आणि महत्त्वाची असल्याचं कळतंय.

संजय मिश्राचा पोस्टरवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र याच चित्रपटातील अभिनेत्री इलियाना डिक्रूझने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्टर शेअर करत कॅप्शन दिलंय आणि याच कॅप्शनची चर्चा सर्वत्र होतेय. ‘हा लबाड…ज्याच्यासाठी माझं नेहमी झुकतं माप असतं,’ असं कॅप्शन इलियानाने दिलंय. मागील अनेक वर्षे संजय मिश्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय मिश्रा आपल्या अभिनयाने काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader