प्रसिद्ध संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यानंतर आता सोनी टीव्हीने त्यांना दणका दिला आहे. सोनी टीव्हीने अनू मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’चे परीक्षकपद सोडण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. पार्श्वगायिका सोना मोहपात्रा, श्वेता पंडित यांसोबतच आणखी दोन महिलांनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे धक्कादायक आरोप केले आहेत.
अनू मलिक यांच्यावर जेव्हापासून आरोप होऊ लागले तेव्हापासून सोनी टेलिव्हिजनच्या टीममध्ये त्यांच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली होती. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. त्याचप्रमाणे अनू मलिक यांच्या पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आल्याचे समजत आहे.
#MeToo : मीसुद्धा त्या प्रसंगाला बळी पडले- रेणुका शहाणे
प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. १९९०मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.