अनुभव सिन्हा यांच्या ‘मुल्क’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आल्यानंतरही सिन्हा यांना पाकिस्तानी नागरिकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली तर बेकायदेशीरित्या पहा. पण हा चित्रपट एकदा तरी पहाच, असं आवाहन सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणाऱ्या हा चित्रपट मुस्लिमविरोधी असल्याचा दावा पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डाने केला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मात्र या बंदीमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रचंड संतापले असून ट्वीटरच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘माझा ‘मुल्क’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र तो पाकिस्तानविरोधात असल्याचं मत पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचं आहे. हा चित्रपट ना मुस्लिमविरोधी आहे, ना पाकिस्तानविरोधी आहे. या चित्रपटामध्ये प्रेमभावनेला महत्व देण्यात आलं आहे. यात हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढावा, हा संदेश यात देण्यात आल्याचं सिन्हा यांनी म्हटले आहे. हा चित्रपट आपण जरूर पाहा, असे आवाहनही त्यांनी पाकिस्तानातील प्रेक्षकांना केलं आहे.

पुढे ते असंही म्हणाले, ‘माझी एकच विनंती आहे हा चित्रपट तुम्ही पहा आणि ठरवा की खरंच त्याच्यात बंदी घालण्यात यावी असं काही आहे का? हा चित्रपट तुम्ही कायदेशीर मार्गानेच पहा, पण जर खरंच तुम्हाला खरं खोटं करुन पाहायचं असेल तर बेकायदेशीररित्या पाहून बघा. या चित्रपटासाठी आमच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्यात गैर असं काहीच दाखविण्यात आलेलं नाही’. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, रजत कपूर, आशुतोष राणा, मनोज पहवा आणि नीना गुप्ता हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत.

Story img Loader