‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला, मात्र या वेळी भारतासाठीची आनंदाची बातमी म्हणजे दिल्लीवर आधारित शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ला बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मसाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाने ऑस्करच्या स्पर्धेत प्रवेश केला आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या ९ वर्षीय मुलीकडे आहे.
एडम जे ग्रेव्स आणि सुचित्रा मट्टई यांनी दिग्दर्शित ‘अनुजा’ मध्ये एका ९ वर्षीय मुलीची कथा आहे. या चित्रपटात सजदा पठाण प्रमुख भूमिकेत असून अनन्या शानबाग तिच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. दिल्लीमध्ये चित्रित या चित्रपटाचे निर्माते गुनीत मोंगा, प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री मिंडी केलिंग आहेत.
चित्रपटाची स्टार सजदा पठाण हिची स्वतःचीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे. ‘अनुजा’ तिचा दुसरा चित्रपट आहे. सजदा पूर्वी झोपडपट्टीत राहत होती आणि एका एनजीओने तिचे जीवन बदलले. याआधी तिने लेटिटिया कोलंबनी यांच्या ‘द ब्रॅड’ या चित्रपटात मिया मेल्जरबरोबर काम केले आहे.
सजदा दिल्लीतील एका कारखान्यात बालमजूर म्हणून काम करायची. ‘सलाम बालक’ ट्रस्टने तिची यातून सुटका केली. आणि आता ती त्यांच्या डे केअर सेंटरमध्ये राहते. १९८८ मध्ये मीरा नायर यांच्या ऑस्कर नामांकित ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटाच्या उत्पन्नातून ‘सलाम बालक’ ट्रस्टची स्थापना झाली. या ट्रस्टने शाइन ग्लोबल आणि कृष्णा नाईक फिल्म्सच्या सहयोगाने ‘अनुजा’ ही शॉर्टफिल्म तयार केली आहे.
२०२५ अॅकेडमी अवॉर्ड्स २ मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहेत. ‘अनुजा’चा बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मसाठी ‘ए लियन’, ‘आय अॅम नॉट अ रोबोट’, ‘द लास्ट रेंजर’, आणि ‘द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेन्ट’ यांबरोबर सामना होणार आहे. ‘अनुजा’ लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.