अभिनेते अनुपम खेर स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे ते सध्या चर्चेत असतात. अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. या वर्षातला आतापर्यंतच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती.
नुकतीच अनुपम यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग कश्यपने यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रांवर टीका केली होती. “आदित्य चोप्रा चित्रपटाच्या प्रत्येक विभागावर नियंत्रण ठेवतात. ते निर्मात्यांवर अनेक बंधने लादून त्यांना असक्षम बनवतात.” असा दावा अनुरागने केला होता. या विधानावरुन अनुपम खेर यांनी अनुरागला खडे बोल सुनावले आहेत. “मला आदित्य चोप्राचा खूप, खूप अभिमान आहे. यशजींचे कुटुंब मला माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. यशराज फिल्म्स सारखे साम्राज्य तयार करणे सोपी गोष्ट नाहीये’ असे म्हणत त्यांनी आदित्यची पाठराखण केली आहे. तसेच त्यांनी “अनुराग कश्यपला कोणी कसे वागावे हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला ?” असं म्हणत खडे बोल सुनावले.
आणखी वाचा- “आदित्य चोप्रा, करण जोहर आता मला काम देत नाहीत कारण…” अनुपम खेर यांनी व्यक्त केली खंत
सध्या कलासृष्टीत बॉलिवूडविरोधी वारे वाहत आहेत. आमिर खानच्या बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ अलिकडेच प्रदर्शित झाला. आमिरच्या जुन्या वक्तव्यांवरुन नेटकऱ्यांनी त्याला चांगलचं धारेवर धरलं. त्याच्या चित्रपटाविरोधात बॉयकॉटची मोहीम राबवली गेली. ”बॉलिवूड कलाकारांनी राष्ट्राच्या विरोधात केलेल्या विधानांचा विसर त्यांना पडला असला तरी, त्या गोष्टी लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या परिस्थितीला ते स्वत: जबाबदार आहेत. माझ्या या मतामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो. पण मला माझा देश अधिक प्रिय आहे.” या शब्दात अनुपम यांनी आमिर खानला अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.
दरम्यान यशराज फिल्म्सची स्ठापना सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा यांनी केली होती. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने, आदित्य चोप्राने या मोठ्या निर्मितीसंस्थेची सूत्रे हातात घेतली. या वर्षी यशराज फिल्म्सद्वारे निर्मित ‘जयेशभाई जोरदार’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘शमशेरा’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.