‘सिल्वर लायनिंग्ज प्लेबुक’ या चित्रपटाच्या निमित्ताने हॉलिवूडमध्ये रमलेल्या अनुपम खेर यांनी सुमारे वर्षभरानंतर आत्ता कुठे बॉलिवूडचाएक चित्रपट पूर्ण केला आहे पण, तोही लंडनमध्ये. ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये अनुपम खेर ‘जो आर्मस्ट्राँग’ची नावाची व्यक्तिरेखा साकारतायत. थोडासा विनोदी पण जरा जास्तच वाईट अशा खलनायकाची भूमिका अनुपम यांच्या वाटय़ाला आली असून या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला अवकाशायानातून सफर करायची संधी मिळाली. ‘नॅशनल स्पेस सेंटर’मध्ये पाऊल टाकल्यापासून एखाद्या लहानग्याला अद्भुत गोष्टींचा खजिना दिसावा तशी आपली अवस्था झाली होती, असे अनुपम खेर यांनी सांगितले.
धर्मेद्र आणि सनी आणि बॉबी या देओल खानदानाने एकत्र येत बनवलेला ‘यमला पगला दिवाना’ लोकांना आवडला. तिकीटबारीवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आणि त्यामुळे देओलांचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे ‘यमला पगला दिवाना’चा सिक्वल येऊ घातला आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांना जोिगदर सिंग ब्रार उर्फ जो आर्मस्ट्राँगची दमदार व्यक्तिरेखा देत चित्रपटाच्या एकूणच मांडणीचा दर्जा उंचावण्यात आला आहे. सध्या निवडक चित्रपटांवर भर देणाऱ्या अनुपम खेर यांनी ही भूमिका वेगळी होती म्हणून स्वीकारल्याचे सांगितले. ‘यमला पगला दीवानाचे चित्रिकरण अखेरीस संपले आहे. जॉनी लिव्हर आणि सुचेता खन्ना यांच्याबरोबर नॅशनल स्पेस सेंटरमध्ये चित्रिकरण करताना मी खूप धम्माल अनुभवली आहे. स्पेस सेंटरची जागा ही मुळात काहीतरी शिकवणारी आहे. त्यामुळे इथे चित्रिकरण करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी प्रबोधन आणि मनोरंजन दोन्ही करणारा होता’, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे. ‘अवकाशयात्रीचा तो सूट परिधान केल्यानंतर लहान मुलगा कसा पहिल्यांदाच आपल्या आईवडिलांबरोबर स्पेस सेंटर बघताना डोळे विस्फारून बघत राहील तशी माझी अवस्था होती. तिथल्या संशोधकांनी अनेक लहान-सहान गोष्टी समजावून दिल्या. असा तुम्हाला वेगळे काही शिकवून जाणारा अनुभव फार कमी वेळा मिळतो. तो मला या जो आर्मस्ट्रॉंगच्या भूमिकेमुळे मिळाला आहे’, असे अनुपम खेर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा