बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. आज अनुपम खेर यांचा ६७वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनुपम खेर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते अगदी फिट दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले, “आज मी माझे ६७ वे वर्ष सुरू करत असताना, माझ्याकडे माझ्यासाठी असलेली एक नवीन दृष्टी सादर करण्यासाठी मी प्रेरित आणि उत्साहित आहे! ही छायाचित्रे गेल्या काही वर्षांत मी केलेल्या संथ प्रगतीचे उदाहरण आहेत. ३७ वर्षांपूर्वी तुम्ही एका तरुण अभिनेत्याला भेटला होता ज्याने अत्यंत अपारंपरिक पद्धतीने या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि ६५ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकार केली. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी एक कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका आणि पैलू सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक स्वप्न आहे जे माझ्या मनात नेहमीच होते, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी कधीही काहीही केले नाही.”

ते पुढे म्हणतात, “हे स्वप्न होते, माझा फिटनेस गांभीर्याने घेण्याचे आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती दिसण्याचे, अनुभवण्याचे. मी माझ्या फिटनेस प्रवासाच्या मार्गावर चालणे सुरू केले आहे आणि मी जे काही करतो त्याप्रमाणेच मला हा प्रवासदेखील तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मी माझे चांगले दिवस आणि वाईट दिवस तुमच्यासोबत शेअर करेन आणि आशा आहे की एका वर्षानंतर, आपण एकत्र माझ्यातील नवेपण साजरे करू. मला शुभेच्छा द्या! हे २०२२ आहे. #YearOfTheBody. जय हो! ?? #KuchBhiHoSaktaHai #HappyBirthdayToMe”

जेव्हा बॉलिवूडच्या ‘मेड फॉर इचअदर’ जोड्यांचे मोडले संसार, ‘हे’ ७ घटस्फोट ठरले सर्वात महागडे

अनुपम खेर यांची पोस्ट त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडली असून या पोस्टवर अनेक लाइक्स आले आहेत. तसेच, त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा रॉकस्टार! तुम्ही खूपच फिट दिसत आहात.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे, “माझ्या आवडत्या लिजंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्या आरोग्यदायी शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत.”

अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नेटकरी देखील अनुपम खेर यांच्या प्रत्येक पोस्टला कायम पसंती देताना दिसतात. अनुपम खेर अनेकदा त्यांच्या आईसोबतचे विनोदी व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. अनुपम खेर यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,’राम लखन’,’खेल’, ‘डर’ अशा अनेक चित्रपटांची नावं यामध्ये आहेत. त्यांना पद्मश्री,पद्मभूषण पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher expressed his desire on the occasion of his 67th birthday pvp