हिंदी चित्रपटांबरोबरच हॉलिवूड चित्रपटांमध्येही ठसा उमटवणारे अभिनेते अनुपम खेर यांना नुकतेच ‘सूर आराधना’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारा भारतीय अभिनेता म्हणून अनुपम खेर यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे हे १९ वे वर्ष आहे.
दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृहात एका शानदार सोहळ्यात भाजप नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या हस्ते खेर यांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘मला हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होतो आहे. तुम्ही जे काम करता त्याची पावती तुम्हाला जेव्हा पुरस्काराच्या रूपाने मिळते तेव्हा चांगले काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते’, अशा शब्दांत अनुपम खेर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
अनुपम खेर यांनी ‘बेंड इट लाइक बेकहॅम’, ‘ब्राइड अँड प्रेज्युडाइस’, ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस’ अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून काम केलेले आहे. यावर्षी त्यांनी रॉबर्ट डी निरो, ब्रॅडली कूपर आणि ख्रिस टकर यांच्याबरोबर ‘सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक’ या हॉलिवूडपटात काम केले असून त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खेर यांच्याबरोबर संगीतकार बप्पी लाहिरी, ललित पंडित, एल. सुब्रमण्यम्, कविता कृष्णमूर्ती, रिचा शर्मा आणि स्वानंद किरकिरे यांनाही यावेळी ‘सूर आराधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Story img Loader