तब्बल १४ वर्षांच्या मेहनतीनंतर आमिरचा खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ सपशेल आपटला आहे. बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका या चित्रपटाला बसला आहे. चित्रपटसृष्टीतल्या मोठमोठ्या कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक जरी केले असले तरी सामान्य जनतेने चित्रपट नाकारला आहे. याच दरम्यान नुकतीच काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षरित्या आमिर खानची खिल्ली उडवली आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत अनुपम यांना आमिरच्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता.
मध्यंतरी अनुपम खेर आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची भेट झाली तेव्हाचा त्यांचा एक फोटो अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आणि ट्विटरवर पोस्ट केला आणि त्याबरोबर लिहिलं की, “अभिनेत्याला #SuperStar म्हणण्याचा निकष त्यांच्या चित्रपटांच्या कमाईवर अवलंबून असतो. हा आहे यावर्षीच्या दोन सुपरस्टार्सचा फोटो. कार्तिकला भेटून खूप आनंद झाला. आत्ता कुठे ही कार्तिकची सुरुवात आहे, त्याला अजून बरंच पुढे जायचंय आणि मी तर गेल्या ४० वर्षांपासून या रेसमध्ये धावतोय.”
असं म्हणत अनुपम खेर यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानच्या चित्रपटावर आणि त्याला लागलेल्या बिरुदावर टीका केली आहे. हे वर्षं बॉलिवूडसाठी अत्यंत खडतर असं वर्षं आहे. किंबहुना कोरोना काळापासूनच लोकांचा बॉलिवूडप्रती असलेला राग आणि चीड दिवसागणिक वाढत आहे. यावर्षी फक्त २ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. एक म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’ ज्याने ३५० करोड कमावले तर कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’ या चित्रपटाने २५० कोटींचा गल्ला जमवला. अनुपम यांच्या या पोस्टचा उद्देश कुणाचीही खिल्ली उडवण्याचा नसला तरी सोशल मीडियावर याचा संबंध आमिरच्या चित्रपटाच्या अपयशाशी जोडला जात आहे.
अनुपम खेर हे त्यांच्या सडेतोड भूमिकेसाठी आणि ट्विटसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. तसेच ते उघडपणे त्यांची राजकीय बाजू मांडतात आणि त्यामुळेच त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोलदेखील केलं जातं. अनुपम यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’ मधल्या कामाचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे.
आणखीन वाचा : स्वतः भाड्याने घेतलेल्या घरात राहून अनुपम खेर यांनी आईसाठी बांधला आलिशान महाल