‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेतील ‘ठाकुर सज्जन सिंह’ ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं आज निधन झालं. ६३ वर्षीय अभिनेते अनुपम श्याम यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करायचे बंद झाले होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती फारच खालावली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूडसह टीव्ही जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडसह टीव्ही जगतातील अनेक कलाकार त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ अभिनेते अनुरम श्याम हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. मुंबईच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसिस करत होते. पण रविवारी रात्री अचानक त्यांच्या तब्बेतील बिघाड झाला आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमूळे त्यांचं निधन झालं. आज दुपारी मुंबईतल्या गोरेगाव इथल्या शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांना अखेरचा निरोपा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक कलाकार उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम गेली २७ वर्षे फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक कलाकार यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले. यात यशपाल शर्मा, आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, अभय भार्गव सारख्या अनेक कलाकारांनी अनुपम श्याम यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर सुद्धा अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिग्दर्शक अर्जुन पंडित, अभिनेता मनोज जोशी, रणवीर शौरी या कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

अभिनेते अनुपम श्याम यांनी टीव्ही मालिकां व्यतिरिक्त चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. पण खरी लोकप्रियता त्यांना ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘ठाकूर सज्जन सिंह’ची भूमिका लोकप्रिय ठरली होती. ते खऱ्या आयुष्यातही याच नावाने ओळखले जात होते. आजारी असतानाच ते या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात सुद्धा काम करत होते. या शूटिंग दरम्यान जास्त पाणी पिल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती, असं सांगितलं जातंय. गेल्या काही वर्षापासून ते किडनी इन्फेक्शनचा सामना करत होते. अशात त्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानं त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam shyam death news celebs attend his last rites prp