ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माधवी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘मला तुमच्याशी खूप काही बोलायचे होते. पण तुम्ही त्या आधीच आम्हाला सोडून गेलात’ या अशयाचे कॅप्शन दिले आहे. रुपाली आणि माधवी यांनी ‘अनुपमा’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. माधवी यांनी अनुपमाच्या आईची भूमिका साकारली होती.

माधवी गोगटे यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. इतकंच नव्हे तर त्यांची भूमिका असलेल्या अनेक हिंदी मालिका, चित्रपटही सुपरहिट ठरले. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.