अनुराग कश्यपच्या गॅंग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील अभिनयामुळे मनोज वाजपेयीला समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली आणि लोकांनाही तो फार आवडला. शिवाय, हा चित्रपट देशविदेशातील महोत्सवांमधून दाखवला गेल्याने मनोजला आता हॉलिवुडच्या दिग्दर्शकांकडूनही चित्रपटासाठी विचारणा होऊ लागली आहे. आपण हॉलिवुड चित्रपट करण्याच्या मार्गावर आहोत आणि तिथे पोहोचण्याचे श्रेय फक्त आणि फक्त दिग्दर्शक अनुरागला आहे, असे मनोज वाजपेयीने म्हटले आहे. अनुराग म्हणजे माझ्यासाठी हॉलिवुडचे तिकीट आहे, अशा शब्दांत आपल्या दिग्दर्शकाचे कौतुक मनोजने केले आहे.
गॅंग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटाचा प्रीमिअर कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. त्यानंतर अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला. अनुरागने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधूनही दाखवल्यामुळे मनोजचे काम हॉलिवुड दिग्दर्शकांच्याही नजरेस पडले. त्यामुळे त्याला आता तेथील चित्रपटकर्मीकडून विचारणा होऊ लागली आहे.
 ‘माझ्याकडे काही प्रस्ताव आले आहेत. सध्या मी एका स्वतंत्र अमेरिकन चित्रपटकर्मीकडून आलेली पटकथा वाचतो आहे. हा चित्रपट कुठल्याही स्टुडिओकडून आलेला नाही. त्यामुळे एक अभिनेता म्हणून स्वातंत्र्य मिळेल, असे वाटते. या चित्रपटाची बोलणी यशस्वी झाली तर मी नक्कीच हा आंतरराष्ट्रीय चित्रपट करेन’, असा विश्वास मनोजने व्यक्त केला आहे.
‘मला हॉलिवुडच्या ऑफर्स येतायत त्याचे कारण अनुरागच आहे. मी सतत अनुरागकडे चांगल्या पटकथांसाठी तगादा लावला होता. आत्ता जे चित्रपट माझ्याकडे आले आहेत ते त्याच्या सांगण्यावरूनच आले आहेत. म्हणून अनुराग हा माझ्यासाठी हॉलिवुडचे तिकीट आहे’, असे मनोजने बोलून दाखवले.
मला मोठय़ा आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून काम करण्यापेक्षा छोटय़ा पण वेगळ्या विषयावरच्या चित्रपटातून काम करायला आवडेल, असेही मनोजने पुढे म्हटले आहे. ‘मी एकदा तब्बूचे या विषयावरचे मत ऐकले होते. मला ऑस्कर विजेत्या अ‍ॅंग ली सारख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात छोटी भूमिका जरी मिळाली तरी ती मी आवडीने करेन, असे ती म्हणाली होती. तिचे म्हणणे खरेच आहे. एकतर आपले आयुष्य हे छोटे आहे. अशी चांगली संधी पुन्हा तुमचे दार कधी ठोठावेल हे कोण सांगणार,’असे सांगत मनोजने आपल्या चित्रपटांच्या निवडीमागची भूमिका स्पष्ट केली.
‘मी याआधी फक्त यश चोप्रांच्या हाताखाली काम करायचे म्हणून वीर झारा केला होता. पण, अशाप्रकारे काम करण्यासाठी ती भूमिका करण्याची उर्मी तुम्हाला आतूनच यायला हवी’, असेही त्याने आग्रहाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा