सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकणाऱ्या सिनेमांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, अनुराग कश्यपचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘बॉम्बे वेलवेट’ सेन्सॉर बोर्डाकडे जायच्या आधीच कात्रीत सापडला आहे. कथेच्या प्रेमात पडून म्हणा किंवा चित्रीकरणाच्या प्रेमात पडून म्हणा अनुरागने चित्रपट इतका मोठा केला आहे की त्याने बोलावलेल्या खास संकलकाने चित्रपटातील सगळी गाणीच काढून टाकली आहेत.
‘बॉम्बे वेलवेट’ हा चित्रपट १९६०च्या दशकातील मुंबईत घडतो. त्या वेळची मुंबई दाखविण्यासाठी अनुरागने संपूर्ण चित्रपट श्रीलंकेत चित्रित केला आहे. मात्र, जरा विस्ताराने चित्रपट करूया या शैलीनुसार त्याने एवढे चित्रीकरण केले आहे की चित्रपटाची लांबी कमी करता करता संकलकाच्या नाकीनऊ आले आहेत. ‘बॉम्बे वेलवेट’च्या संकलनासाठी अनुरागने हॉलीवूडपटांचे संकलन करणाऱ्या थेल्मा शूमाकेर यांची मदत घेतली आहे. थेल्मा यांनी मार्टिन स्कोर्सेसी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे संकलन केले आहे. अनुरागच्या चित्रपटाचे संकलन करताना मात्र त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने चित्रपटाला चांगलीच कात्री लागली आहे.
रणबीर कपूर व अनुष्का शर्मा यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘बॉम्बे वेलवेट’ १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते आणि सप्टेंबरमध्ये तो प्रदर्शित केला जाणार होता. प्रत्यक्षात चित्रपटाच्या संकलनासाठी आणि व्हीएफएक्ससाठी बराच वेळ लागणार असल्याने तो गेल्या वर्षी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्याच वेळी चित्रपट २०१५च्या मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय जाहीर करीत अनुराग कश्यपने वेळ वाढवून घेतला होता. तरीही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख महिन्यावर ठेपली असतानाही चित्रपटाचे संकलन पूर्ण होऊ शकलेले नाही.
चित्रपट तीन तासांपेक्षा किती तरी जास्त लांबीचा झाला असल्यामुळे थेल्मा शूमाकेर यांना खूप ठिकाणी कात्री लावावी लागली आहे.
चित्रपटाची लांबी आटोक्यात आणण्यासाठी ‘बॉम्बे वेलवेट’मधील पाचही गाण्यांना कात्री लावण्यात आली आहे. याचा सगळ्यात मोठा फटका या चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडनला बसणार आहे. रवीना टंडनची या चित्रपटाची छोटीशी मात्र महत्त्वाची भूमिका आहे. तिच्यावर दोन गाणी चित्रित करण्यात आली होती. त्यापैकी एक शीर्षकगीत होते. आता रवीनाची दोन्ही गाणी कापण्यात आली असल्यामुळे तिचा चित्रपटातील वावर हा नाममात्र उरणार आहे. याशिवाय, रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रित झालेली तीन गाणीही काढून टाकण्यात आली आहेत. एवढे करूनही चित्रपट तीन तासांच्या कालावधीपेक्षा अधिक लांबीचा झाला असून तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.