आपल्याकडे ऑस्कर पुरस्कारांना बरंच महत्त्व दिलं जातं असं म्हणतात. भारताकडून जेव्हा एखादा चित्रपट ऑस्करला पाठवला जातो तेव्हा प्रत्येक भारतीयाला त्याचं अप्रूप वाटतं. भारताला ऑस्कर पुरस्कार फारसा कधी मिळाला नसला तरी नमांकनं बरीच मिळाली आहेत. ‘मदर इंडिया’पासून अलीकडे आलेल्या ‘गली बॉय’पर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आपण ऑस्करच्या शर्यतीत पाठवले आहेत. काहींना ऑस्कर नामांकन मिळालं, तर काही चित्रपट शर्यतीच्या बाहेर आले. आता असाच एक बिग बजेट आणि भारतातला यंदाचा सर्वात मोठा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. तो चित्रपट म्हणजे ‘RRR’
‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटालाही चांगलंच यश मिळालं. ‘बाहुबली’च्या तुलनेत आकडे तसे कमीच होते पण हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. खासकरून Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने आणखीनच कमाल केली. भारतात तर या चित्रपटाने रेकॉर्ड तोडले शिवाय परदेशातही या चित्रपटाला चांगलंच पसंत केलं गेलं.
आणखीन वाचा : ‘पुष्पा’ ते RRR, हे आहेत साऊथचे आठ महागडे चित्रपट; बजेट ऐकलं तर आवाक व्हाल!
नुकतंच एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप याने या चित्रपटाबद्दल दावा केला आहे. या मुलाखतीत अनुरागने ‘RRR’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. अनुराग म्हणतो की यावेळेस जर भारताकडून ऑस्करसाठी या चित्रपटाला पाठवलं तर ९९ % या चित्रपटाला नामांकन आणि पुरस्कार मिळायची शक्यता आहे. अनुरागच्या या वक्तव्यामुळे ‘RRR’ फॅन्ससुद्धा आता उत्सुक आहेत. इतकंच नाही तर हॉलीवूडच्या सुपरहिरो चित्रपटांपेक्षा जास्त पसंती तिथल्या लोकांनी ‘RRR’ला दिली असल्याचंही अनुरागने स्पष्ट केलं आहे.
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे सुपरस्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आलिया भट, अजय देवगण तसेच आपले मारठमोळे मकरंद देशपांडेसारखे मातब्बर कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांनी ‘बाहुबली’इतकं प्रेम या चित्रपटावर जरी केलं नसलं तरी साऱ्या जगाने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ऑस्करसारख्या शर्यतीत हा चित्रपट जाणार का आणि अनुरागचं भाकीत खरं ठरणार का? हे येणारा काळच ठरवू शकेल. हा चित्रपट तुम्ही Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.