“योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मालक नाहीत तर मुख्यमंत्री आहेत”, अशा शब्दांमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपनं दिग्दर्शक मधुर भांडारकरला ट्विटवरुन सुनावलं आहे. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टिका करणारे लोक सिनेमांसाठीच्या अनुदानाचा फायदा घेतात अशी टिका भांडारकर यांनी एका कार्यक्रमामध्ये केली होती. त्यावरुनच हे अनुदान बऱ्याच काळापासून मिळत असल्याची आठवण करुन देताना अनुराग यांनी भांडारकर यांना खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टिका करणारे आणि सरकारचे समर्थन करणारे असे दोन गट बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये पडलेले दिसून येत आहे. जय श्रीराम प्रकरणावरुन सरकारविरोधी आणि सरकारचे समर्थन करणारी पत्र दोन्ही बाजूकडील कलाकारांनी लिहिली आहे. या सर्वांमुळे दीड वर्षापूर्वी देशात सुरु झालेली असहिष्णुतेच्या चर्चेने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मात्र यंदा या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींचे प्रमाण खूपच अधिक आहे. खास करुन सिनेसृष्टीमधील कलाकार यामध्ये भाग घेतानाचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

देशभरामध्ये वाढणाऱ्या मॉब लिचिंग, अहिष्णुता याबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र ४९ कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले. त्यानंतर मधुर भंडारकर आणि इतर ६२ कलाकारांनी या पत्राला विरोध करणारे आणि सरकारचे समर्थन करणारे पत्र मोदींना लिहिले यामध्ये ‘निवडक घटनासंदर्भात रोष व्यक्त केला जातो तसेच खोट्या पद्धतीने घटना सांगितल्या जातात’ अशी टिका मोदी विरोधकांवर समर्थक कलाकारांनी आपल्या पत्रामधून केली. मात्र हा वाद केवळ पत्रांपुरता मर्यादित राहिला नसून ट्विटवरही विरोधी मतप्रवाहांच्या सेलिब्रिटीचे खटके उडत असल्याचे चित्र दिसत आहे.

अनुराग कश्यपने मधुर भंडारकर यांच्यावर ट्विट करुन टिका केली आहे. सिनेमांना अनुदान देण्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात सुरुवात झालेली नाही अशी आठवण अनुरागने मधुर यांना करुन दिली आहे. भंडारकर यांनी केलेले वक्तव्य हे विनोदी असून मी मोदींचा विरोधक असलो तरी १०० टक्के भारतीय आहे असा टोलाही अनुरागने लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भांडारकर यांनी जे मोदींवर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टिका करत आहेत तेच लोक सरकारी अनुदानाचा फायदा घेत आहेत असं मत नोंदवले. यावरुनच अनुराग यांनी भांडारकर यांना सुनावले. ‘काय विनोद केलाय (मधुर भंडारकर यांनी) मी या (उत्तर प्रदेश) राज्यातला आहे. माझा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. मी उत्तर प्रदेशमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. सिनेमांना अनुदान देण्यास योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सुरुवात केलेली नाही. योगी आदित्यनाथ काही उत्तर प्रदेशचे मालक नसून मुख्यमंत्री आहेत. मी मोदींशी सहमत नसेल पण मी १०० टक्के भारतीय आहे. मी भारतामध्ये सिनेमे बनवतो आणि बनवत राहणार,’ असे अनुराग ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

पुढच्या ट्विटमध्ये अनुराग यांनी लोकसभेत केवळ सरकारचा फायदा होणारे विधेयक संमत केले जात असल्याचा आरोप केला आहे. ‘लोकसभेत तिच विधेयके मंजूर होत आहेत ज्यांचा सरकारला फायदा होणार आहे. आणि जी विधेयके तयार केली जात नाहीत त्यामध्येही सरकारचाच फायदा आहे. लोकांच्या भल्यासाठी सुद्धा कायद्यात बदल व्हायला हवा,’ असं अनुराग या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरकार समर्थक आणि सरकार विरोधी कलाकार एकमेकांवर ट्विटवरुन टिका करताना दिसत आहेत. यामध्ये शेखर कपूर आणि जावेद अख्तर यांच्यासारख्या वरिष्ठ कलाकारांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap slams madhur bhandarkar says cm yogi adityanath is not the owner of uttar pradesh scsg