इंडिया की भारत ही चर्चा मध्यंतरीच्या काळात चांगलीच रंगली होती. त्याचं कारण ठरलं राष्ट्रपतींनी G20 परिषदेसाठी विदेशातल्या पाहुण्यांना पाठवलेलं निमंत्रण. त्या निमंत्रण पत्रांवर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता. जिथून या चर्चेला आणि वादाला सुरुवात झाली. आता बेधडक आणि बिनधास्त अशी ओळख असलेल्या अनुराग कश्यपनेही याच विषयावर भाष्य केलं आहे. एका लहरी माणसामुळे सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो आहे असं वक्तव्य त्याने एका मुलाखतीत केलं आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आता त्याला ट्रोल केलं जाण्याची आणि यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हटलं आहे अनुराग कश्यपने?
“आपल्या देशाचं नाव बदलण्याचा निर्णय जर घेतला गेला तर पुन्हा एकदा करामधून जो निधी देशाला मिळाला आहे त्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होईल. कारण इंडिया-भारत मध्ये जर भारत हे नाव ठेवलं गेलं तर सगळ्या अधिकृत कागदपत्रांवर ते आणावं लागेल. सगळेच दस्तावेज नव्याने छापावे लागतील. एका लहरी माणसाच्या निर्णयाचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. मागचा-पुढचा विचार न करता निर्णय घेतला की आणखी काय होणार?” असा प्रश्न अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींचं नाव न घेता उपस्थित केला आहे.
हे पण वाचा- अनुराग कश्यप: सिनेमाला धर्म मानणारा दिग्दर्शक
एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास
अनुराग कश्यप हा सध्या त्याच्या हड्डी या सिनेमातल्या व्हिलनच्या भूमिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. याच सिनेमाच्या विषयाबाबत अनुराग कश्यप, जीशान अय्युब आणि अक्षत अजय शर्मा यांची मुलाखत घेण्यात आली. याच मुलाखतीत अनुराग कश्यपने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. अनुराग म्हणाला, “मला हे समजत नाही की इंडिया कधी भारत नव्हता? फक्त एका कागदाच्या तुकड्यावर इंडियाच्या जागी भारत लिहलं जाईल. ज्यानंतर प्रत्येक सरकारी दस्तावेज, आधार कार्ड आणि सगळ्याच गोष्टींवर हे नाव बदलावं लागेल. पासपोर्ट नव्याने तयार करावा लागेल. रेशनकार्डाचं नुतनीकरण करावं लागेल. सगळं बदलण्यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च होईल. एक नाव बदलण्यासाठी चार वर्षांपासून जो कर घेतला गेला आहे तेवढा पैसा खर्च होईल. पैसे खर्च न करता इंडियाचं भारत करणं हे शक्यच नाही.” असं अनुरागने म्हटलं आहे.
काय काय नव्याने छापणार ते तरी सांगा
एका माणसाच्या लहरी निर्णयामुळे किती त्रास होईल विचार करा. बँकांमधल्या नोटा बदलाव्या लागतील, शिक्षणाच्या पदव्या बदलून घ्यावा लागतील, सगळ्यांना देण्यात आलेली करोना लस घेतल्याची प्रमाणपत्रं बदलावी लागतील मला एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही काय काय पुन्हा छापणार? ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकांनी काय फक्त वाट बघत बसायची का? तोपर्यंत लोकांना रेशन मिळणार नाही का? लोक प्रवास करु शकणार नाहीत का? असेही प्रश्न अनुराग कश्यपने या मुलाखतीत उपस्थित केले आहेत.