व्हिडिओ जॉकी, अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेली शिबानी दांडेकर सध्या अभिनेता फरहान अख्तरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर दिसतात. ही जोडी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा देखील आहेत. मात्र शिबानीचं फरहानसोबत असलेल्या नात्याबद्दल मी कधीही तिला प्रश्न विचारला नाही असं तिची लहान बहिण अनुषा दांडेकर म्हणाली.
अनुषादेखील व्हिडिओ जॉकी आणि अभिनेत्री आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या मराठी चित्रपटात ती झळकली होती. तिच्या ‘लव्ह स्कूल’ कार्यक्रमाचा चौथा सीझन येत आहे. यावेळी तिला शिबानी आणि फरहानच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना ‘शिबानी माझी मोठी बहिण असून ती कोणाला डेट करतेय हे विचारणं जरा विचित्र आहे’ असं ती म्हणाली. ‘स्पॉट बॉय इ’ला दिलेल्या मुलाखतीत तिनं शिबानी आणि फरहानच्या नात्याविषयी आपलं मत मांडलं.
शिबानीला मी कधीही तिच्या नात्याबद्दल विचारलं नाही, तिनं मला स्वत:हून तिच्या आणि फरहानसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं, असंही अनुषा म्हणाली. अनुष्कानं या मुलाखतीत शिबानी फरहान अख्तरला डेट करत असल्याच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा दिला. फरहान आणि शिबानी दोघंही या वर्षी लग्न करणार का?, असा प्रश्नही तिला विचारण्यात आला यावर ‘कदाचित करतीलही, मला माहिती नाही’ असं उत्तर तिनं दिलं.
अनुषा तिच्या आगामी कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र असून ती या शोमधील तिला सहकलाकार करण कुंद्राला डेट करत आहे.