चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होण्याआधीपासूनच चर्चेत असलेल्या आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरूवारी प्रदर्शित झाला. जवळपास दोन मिनिटे लांबीच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाची नायिका अनुष्का शर्मा आपला विचित्र मित्र ‘पीके’ची ओळख करून देत आहे.
गेले दोन महिने पोस्टरवरून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना हा ‘पीके’ म्हणजे एक ‘वल्ली’ व्यक्तीमत्त्व असल्याचे ट्रेलरवरून लक्षात येते. आपला मित्र हा एक ‘नमुना’ असून त्याचे डोळे हे हेडलाईटसारखे आणि कान उडत्या बशांसारखे असल्याचे वर्णन अनुष्का या ट्रेलरमध्ये करते.
एवढंच नव्हे तर, ‘पीके’ हे एक बहुरंगी व्यक्तीमत्त्व आहे. ‘पीके’ला पान खायला आवडते आणि त्याचा कपड्यांबाबतचा सेन्स भन्नाट आहे. कधी तो भिका-यांच्या वाटीतून पैसे चोरतो, तर कधी पार्कींगमधील गाड्यांमधून कपडे. परंतु ‘पीके’ हा कितीही विचित्र असला तरी ज्याच्यावर प्रेम करावे अशी वल्ली असल्याचं अनुष्का सांगते.
आयुष्यात दारूचा एक थेंबही न प्यायलेल्या तरी ‘पीके’ म्हणून ओळखल्या जाणा-या बहुरंगी व्यक्तीमत्त्वावर आधारीत ‘पीके’ चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader