बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून जम बसवल्यानंतर आघाडीच्या कलाकारांनी चित्रपट निर्माता म्हणून स्वतंत्र खेळी करायला सुरुवात केली. आपणच निर्माता आणि अभिनेता बनायचे आणि चित्रपटाच्या विक्रीतून येणारा नफा अर्धा-अर्धा वाटून घ्यायचा हा त्यांचा फंडा त्यांना भरपूर  पैसे कमावण्यासाठी उपयोगी पडला. मग हेच समीकरण जमवण्यात अभिनेत्री तरी मागे कशाला राहतील? याआधी जुही चावला, प्रीती झिंटा, दिया मिर्झा अशा अभिनेत्रींनी आधीच निर्मितीक्षेत्रात उडी घेतली आहे. पण, आत्ता-आत्ता कु ठे नावारूपाला येऊ पाहणाऱ्या अनुष्का शर्मानेही चित्रपट निर्मितीत उडी घेऊन आपण नेहमीच्या रुळलेल्या वाटेने जाणार नाही याचा जणू इशाराच दिला आहे. ‘एनएच -१०’ चित्रपटाच्या निमित्ताने निर्माती म्हणून पाऊल टाकणारी अनुष्का बॉलिवूडची सर्वात तरूण निर्माती-अभिनेत्री आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवणे आदी मंडळींच्या फँटम कंपनीबरोबर ‘एनएच-१०’ या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्मा करणार आहे. अनुष्का या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करणार आहेत. नवदीपचा ‘मनोरमा ६ फीट अंडर’ या चित्रपटातला थरार लोकांना आवडला होता. त्यामुळे, ‘एनएच १०’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाविषयीही कमालीचे आकर्षण आहे. नावावरूनच चित्रपटाचे कथानक हे राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेले आहे हे सहज लक्षात येईल. एका छान-सुंदर सहलीची चुकीच्या मार्गावर झालेली अखेर हा या चित्रपटाचा विषय आहे. इतका सुंदर विषय मला कारकिर्दीच्या फार लवकरच्या टप्प्यावर करायला मिळतोय, ही कल्पनचा थरारक आहे. मला विषय इतका आवडला की आपण सहनिर्मिती करायची हा निर्णय मी घेतला. आणि निर्माती म्हणून या चित्रपटाशी जोडले गेले, असे अनुष्काने सांगितले.
सध्या दिवाळीचा आनंदीआनंद पसरला आहे. अशा वातावरणात एकापाठोपाठ एक दोन मोठे चित्रपट करणाऱ्या अनुष्काच्या उत्साहाला उधाण आले आहे. एकीकडे राजकुमार हिरानी दिग्दर्शित पीके या चित्रपटात आमिर खानबरोबर आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये रणबीरबरोबर तिने जोडी जमवली आहे. आणि आता अनुरागच्याच फँ टमबरोबर ‘एनएच १०’मध्ये अभिनेत्री-निर्माती अशी ऐन दिवाळीत चित्रपटांची हॅटट्रिक तिने साधली आहे.

Story img Loader