गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा तिच्या ओठांमुळे चर्चेत आहे. तिच्या रूपात झालेला बदल तिच्या अनेक चाहत्यांना पसंत न पडल्याने त्यांनी सोशल मीडियावर याबाबतच्या आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. तिच्या दिसण्याविषयीच्या माध्यमातून येत असलेल्या बातम्या आणि चाहत्यांची नाराजी असह्य झाल्याने, तिने या बाबतचे एक निवेदन जारी केले आहे. आपण कुठल्याही प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी केलेली नसून, फक्त ‘लीप एनहान्सिंग टूल’चा वापर केला असल्याचे तिने म्हटले आहे. ही अभिनव मेकअपची किमया असल्याचे देखील तिने म्हटले आहे.
अनुष्काचे ओठ पाहून चाहत्यांना बसला धक्का!
काही काळापासून मी करत असलेल्या ‘लीप एनहान्सिंग टूल’चा वापर आणि विशिष्ट तंत्राचा वापर करून करत असलेला मेकअप यामुळे कदाचित माझ्या ओठांची ठेवण वेगळी वाटात असावी. मी कुठल्याही प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी केलेली नाही. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या बॉम्बे वेलवेट चित्रपटात मी १९६० आणि ७०च्या दशकातली जाझ गायिकेची भूमिका साकारत असून, त्या व्यक्तिरेखेनुरूप दिसण्यासाठी मी अशा प्रकारचा मेकअप करण्यास सुरूवात केली असल्याने माझे दिसणे थोडे वेगळे वाटत असावे. मी प्लॅस्टिक सर्जरीचे समर्थन करत नाही. माझा प्लॅस्टिक सर्जरीवर विश्वास नसून, अनैसर्गिक मार्गाचा अवलंब करून शरीरात कायमस्वरूपी केलेल्या कोणत्याही बदलाचे मी समर्थन करत नाही. मी याचे समर्थन अथवा याला प्रोत्साहन किंवा असे करण्याचा सल्ला कोणालाही देत नाही, असे तिने या निवेदनात म्हटले आहे. अनुष्काने याविषयी आपली बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी तिचे छायाचित्र बरेच काही सांगून जाते.