भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा नेहमीच त्याच्या खेळामुळे चर्चेत असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मात्र नुकतंच विराट कोहलीने त्याच्याबरोबर घडलेल्या एका प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या खोलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराटने शेअर केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर तिने कॅप्शन लिहिले आहे. त्यात ती म्हणाली, “याआधीही अनेकदा चाहत्यांनी सहानुभूती आणि दयामाया दाखवलेली नाही, याचा अनुभव आहेच. पण हे जे काही झालंय ते खूपच वाईट आहे.”

“जे लोक म्हणतायत की तुम्ही तर सेलिब्रेटी आहात मग असं होणारच, त्यांना मी सांगू इच्छिते, की हे अतिशय वाईट आहे. एका व्यक्तीचा अपमान आणि त्याच्या प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. याचा कधीतरी तुम्हालाही सामना करावा लागू शकतो. प्रत्येकाने स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं जात असेल तर मग मर्यादा कुठे आहेत? याचाही विचार व्हायला हवा.” असेही अनुष्का शर्माने म्हटले.
आणखी वाचा : Video : हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट संतापला; ‘खासगी आयुष्य जपा’ म्हणत व्यक्त केली नाराजी

नेमकं प्रकरण काय?

विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याच कारणामुळे इतरांचे खासगी आयुष्य जपायला हवे, असे म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विराट कोहली राहात असलेल्या हॉटेलमधील खोलीचा आहे. यामध्ये विराटचे बूट, चष्मा, कपडे दिसत आहेत. याच कारणामुळे विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यातील…” भारताच्या अभूतपूर्व विजयानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट

‘आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसेच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ असे म्हणत विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांच्या खासगी जीवनाचा मनोरंजनासाठी वापर करू नका, असे आवाहनही त्याने केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma get angry calls it absolute disgrace after virat kohli hotel room video surfaces online without his consent nrp