बॉलीवूडची नवी फळी आता केवळ अभिनयच नव्हे, तर दिग्दर्शन, निर्मिती, संगीत अशा विविध पातळ्यांवर आपले कौशल्य अजमावत आहे. त्यांच्यातील एक अनुष्का शर्माही लवकरच तिच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत तयार झालेला पहिला चित्रपट ‘एनएच१०’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर होऊ घातलेला अपघात तिच्या प्रसंगावधानाने केवळ टळलाच नाही, तर त्यातून तिने स्वत:सोबतच सेटवरील इतर तंत्रज्ञांचे प्राण वाचविले.
‘पिके’ चित्रपटातील आपल्या अभिनयाबद्दल सर्वाकडून कौतुकाची पावती मिळविल्यावर अनुष्का आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘एनएच १०’ या चित्रपटाच्या तयारीमध्ये गुंतली होती. नवदीप सिंग दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. चित्रपटामधील अनुष्काच्या लुकची आणि अभिनयाची चर्चाही चालू आहे. सहलीवर निघालेल्या एका जोडप्याचे प्रवासादरम्यान काही गुंडांशी भांडण होते आणि त्यातून त्यांच्या मागे संकटांची मालिका सुरू होते. या संकटातून ते स्वत:ला कशा प्रकारे वाचवतात, यावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीच्या महामार्गावरील विविध ठिकाणी करण्यात आले होते. चित्रपटाच्या एक प्रसंगात अनुष्काला गाडी वेगाने चालवत कॅमेरापर्यंत आणायची होती. हा प्रसंग चित्रित करण्यासाठी मून बॉक्स मागविण्यात आला होता. हा मून बॉक्स १५० फुटांच्या उंचीवर क्रेनच्या साहाय्याने लटकवण्यात आला होता. चित्रीकरणादरम्यान दिवसभर धुळीचे वातावरण होते. पण त्याची तमा न बाळगता, चित्रीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रीकरण सुरू असताना अनुष्काचे लक्ष वर लटकविलेल्या मून बॉक्सकडे गेले. त्या वेळी धुळीमुळे मूनबॉक्स फाटून त्यामधील लाइट्स बाहेर लटकू लागले होते. या लाइट्सचे वजन तब्बल ९०० किलो होते. तो बॉक्स फाटून त्यातील लाइट्स खाली पडले असते, तर त्याखाली उभ्या असलेल्या तंत्रज्ञांना दुखापत होण्याची शक्यता होती. धोका लक्षात घेऊन अनुष्काने ताबडतोब चित्रीकरण थांबविले आणि संपूर्ण युनिटला मूनबॉक्सपासून लांब केले. त्यामुळे त्या क्षणाला केवळ अनुष्काच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ होण्याचे टळले.

Story img Loader